जुगारी आणि उनाडटप्पुंमुळे भाईंदरचे रहिवाशी त्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 08:07 PM2019-11-21T20:07:11+5:302019-11-21T20:07:51+5:30
भाईंदर पश्चिमेच्या डॉ. दिगंबर कुलकर्णी मार्गावर दिवस रात्र जुगारी, उनाडटप्पु व रिकामटेकड्यांच्या जाचामुळे स्थानिक रहिवाशी त्रासले असुन या प्रकरणी भाईंदर पोलीसांसह लोकप्रतिनिधींना तक्रारी केल्या आहेत.
मीरारोड - भाईंदर पश्चिमेच्या डॉ. दिगंबर कुलकर्णी मार्गावर दिवस रात्र जुगारी, उनाडटप्पु व रिकामटेकड्यांच्या जाचामुळे स्थानिक रहिवाशी त्रासले असुन या प्रकरणी भाईंदर पोलीसांसह लोकप्रतिनिधींना तक्रारी केल्या आहेत.
भाईंदर पश्चिमेच्या बावन जिनालय जैन मंदिर मागे असलेल्या डॉ. कुलकर्णी मार्गावर राजश्री लॉटरी चालते. या भागात दिवस रात्र बाहेरुन रिक्षा चालक, कामगार वर्ग आदी रिकाम टेकडे तसेच उनाडटप्पुंचा राबता असतो. या ठिकाणी मोबाईल वर जुगार खेळण्यासह खुले आम धुम्रपान करत बसतात. या मुळे परिसरातील रहिवासी त्रासले असुन अनेक वेळा भाईंदर पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या आहेत.
उनाडटप्पु जुगारीं मुळे परिसरातील शांतता भंग झाली असुन महिला - मुलींकडे अश्लील नजरेने पाहणे, त्यांना पाहुन अश्लील हावभाव करणे, शेरेबाजी करणे असे प्रकार नित्याचेच झालेले आहेत. स्थानिक रहिवासी कोणी बोलायला गेल्यास त्यालाच दमदाटी करुन अंगावर धाऊन जातात. यामुळे परिसरात भितीचे वातावरण असुन या उनाडटप्पु - जुगारी रिकामटेकड्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी येथील श्री पार्श्व पुजा व पर्ल या गृहनिर्माण संस्थांसह श्री राष्ट्रीय राजपुत करनी सेनेचे शेरा पुरोहित यांनी भाईंदर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. तसेच वरिष्ठांसह स्थानिक आमदार गीता जैन यांना तक्रार अर्ज दिला आहे अशी माहिती हिमांशु शाह या नागरिकाने दिली आहे.