भाईंदरच्या इसमाचे डिमॅट खाते हॅक करून त्यातील शेअर विकून ३७ लाखांना फसवले
By धीरज परब | Published: November 23, 2023 08:05 PM2023-11-23T20:05:51+5:302023-11-23T20:05:57+5:30
भाईंदर पश्चिमेच्या बालाजी नगर भागात राहणारे प्रमोदकुमार सुराणा हे फोर्ट येथील कंपनीत मुख्य अकाउंटंट म्हणून नोकरी करतात
मीरारोड - भाईंदरच्या एका इसमाचे डिमॅट खाते ईमेल द्वारे हॅक करून त्याद्वारे त्यांच्या डीएमटी खात्यातील ३७ लाख ६२ हजारांचे शेअर एका दिवसात परस्पर विकून त्यांची फसवणूक केली गेली आहे . भाईंदर पोलिसांनी या प्रकरणी २२ नोव्हेम्बर रोजी गुन्हा दाखल केला असून शेअर विकले त्याचा आयपी एड्रेस हा अमेरिकेच्या लॉस अँजेलिस भागातील आहे .
भाईंदर पश्चिमेच्या बालाजी नगर भागात राहणारे प्रमोदकुमार सुराणा हे फोर्ट येथील कंपनीत मुख्य अकाउंटंट म्हणून नोकरी करतात . त्यांनी २०१७ पासून चॉईस इक्विटी ब्रोकिंग ह्या ब्रोकर कंपनीचे डिमॅट खाते उघडले असून त्यातून ते शेअर खरेदी विक्री व्यवहार करतात . २१ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ११ वा. त्यांना मेलचा पासवर्ड रिसेट करण्याचा संदेश आला असता त्यातील ओटीपी त्यांनी कोणास दिला नव्हता . मात्र काही वेळातच त्यांच्या डिमॅट खात्यातील असलेले तब्बल ३७ लाख ६२ हजार मूल्यांचे शेअर व ऑप्शन मधले शेअर हे विक्री करण्यात आले . तसे संदेश मिळाल्या नंतर त्यांनी संबंधितांना कॉल करून स्वतःचे आणि कुटुंबियांचे डिमॅट व ट्रेडिंग खाते ब्लॉक करण्यास सांगितले .
सदर घडला प्रकार त्यांनी चॉईस इक्विटी ब्रोकिंगचे रामरतन चिरनिया व सुनील बगारीया यांना तसेच अनुपालन अधिकारी स्वाती मटकर यांना सांगितला . परंतु त्यांच्या कडून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी वांद्रे येथील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती . ती तक्रार मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या सायबर शाखे कडे आले . कंपनी कडून मिळालेल्या त्या दिवशीच्या विक्री व्यवहाराचा आयपी एड्रेस हा अमेरिकेच्या लॉस एंजेलिस येथील दाखवला होता .
ईमेल आयडी द्वारे लॉग इन करून शेअर ट्रेडिंग कधीच केले नसून ब्रोकर कंपनीने सुरक्षेची काळजी न घेता आपल्या संमती शिवाय शेअर विक्री करून फसवणूक केल्याच्या फिर्यादी वरून भाईंदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे . भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक एस . एस . नाईकवाडी हे तपास करत आहेत .