Bhiwandi Crime | भिवंडी चोरट्यांचा सुळसुळाट, एकाच दिवसात चार चोऱ्या
By नितीन पंडित | Published: December 17, 2022 05:27 PM2022-12-17T17:27:22+5:302022-12-17T17:27:54+5:30
वाहन चोरीसह दागिने चोरीच्या घटनांमध्ये वाढ
नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: पोलीस उपायुक्त परिमंडळ क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर चोरांचा सुळसुळाट झाला असून वाहन चोरी सह दागिने, मोबाईल चोरीच्या घटना नियमित घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून शुक्रवारी एकाच दिवसात चोरीच्या चार घटनांची नोंद विविध पोलीस ठाण्यांमध्ये करण्यात आली आहे.
भिवंडी ठाणे मार्गावरील पुर्णा गावाच्या हद्दीत हमाली काम करणारे रमेश पाटील हे तलावा समोरील रस्त्याने कामावरून घरी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी पाठी मागून येऊन रमेश पाटील यांच्या हातातील मोबाईल खेचून चोरण्याच्या प्रयत्न केला असता त्यांच्यात झटापट झाली. परंतु त्यानंतर चोरट्याने शिवीगाळ ठोशाबुक्याने मारहाण करीत १३ हजार ९०० रुपयांचा मोबाईल चोरी करून पोबारा केला आहे.या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दुसऱ्या घटनेत नीलम विशाल म्हात्रे या आपल्या माहेराहून अंजुर दिवे येथील सासरी जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील बस थांबा या ठिकाणी दुपारी अडीच वाजता आल्या असता ठाणे महानगरपालिका परिवहन विभागाच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मुलुंडकडे जाणाऱ्या बस मध्ये आपल्या मुलासह चढत असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या बॅग मधील तब्बल दोन लाख चार हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरी केले.या प्रकरणी नीलम म्हात्रे यांनी दिलेला तक्रारीवरून निजामपुरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मानकोली येथील वोल्हो कमर्शियल व्हेईकल्स कंपनीच्या गोदामामधील कार्यालयात काम करणारे नदीम इकबाल अहमद अन्सारी यांनी कार्यालयातील बैठक सुरू असल्याने आपला लॅपटॉप टेबलावर ठेवलेला होता. त्याठिकाणी कार्यालयाच्या उघड्या दरवाजावाटे आत शिरलेल्या अज्ञात चोरट्याने तेथील टेबलावरील लॅपटॉप चोरी केला आहे.या बाबत नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तर नारपोली पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर अमोल रत्नराधेश्याम झा याने साईप्रसन्न सोसायटी येथील आपल्या राहत्या घराच्या बाहेर आपली दुचाकी उभी करून ठेवली असतांना अज्ञात चोट्याने चोरी केली.