भिवंडी गुन्हे शाखेकडुन जिलेटीन स्फोटके विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 11:29 PM2022-02-01T23:29:22+5:302022-02-01T23:30:41+5:30
भिवंडीत जिलेटीन व डिटोनेटर विक्रीसाठी आलेल्या तिघांना नदीनाका परिसरात सापळा लावून भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी दुपारी अटक केली आहे.
नितिन पंडीत
भिवंडी: भिवंडीत जिलेटीन व डिटोनेटर विक्रीसाठी आलेल्या तिघांना नदीनाका परिसरात सापळा लावून भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी दुपारी अटक केली आहे. या तिघांकडून २० हजार रुपये किंमतीच्या जिलेटीनचे ५ बॉक्समध्ये साठवलेले एकुण १००० नग तर २५ हजार रुपये किंमतीचे १००० नग डीटोनेटर सह चार लाख रुपये किंमतीची मारूती इको कार असा एकुण रू. ४ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त करून तिघा आरोपींना अटक केली आहे.
एका मारूती इको कार मधुन प्रतिबंधीत जिलेटीन व डीटोनेटर हे विक्री करणेकरीता येणार असल्याची खबर भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली असता मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान नदीनाका पोलीस चौकी समोर सापळा लावला असता एक मारूती इको कार क्रमांक एमएच ०४ एफझेड ९२०० या कारला थांबवुन गाडीत असलेले अल्पेश उर्फ बाल्या हिराजी पाटील ( वय ३४ वर्ष, राहणार आपटी खुर्द, ता. विक्रमगड, पालघर ) पंकज अच्छेलाल चौहान ( वय २३ वर्ष, राहणार विक्रमगड, ) व समीर उर्फ सम्या रामचंद्र वेडगा ( वय २७ वर्ष, राहणार वेडगेपाडा, ता. विक्रमगड ), यांना ताब्यात घेऊन गाडीची पाहणी केली असता गाडीत २० हजार रुपये किंमतीच्या जिलेटीनचे ५ बॉक्समध्ये साठवलेले एकुण १००० नग तर २५ हजार रुपये किंमतीचे १००० नग डीटोनेटर सह चार लाख रुपये किंमतीची मारूती इको कार असा एकुण रू. ४ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त करून तिघांना अटक केली आहे.
हे तिघेही हि स्फोटके चोरीने विक्रीस घेवुन जात असतांना जप्त करण्यात आली असून बॉम्ब शोधक व नाशक पथक, ठाणे यांचे मदतीने तपासणी करुन हि स्फोटके पंचनामा करून सुरक्षीत रित्या जप्त करण्यात आली आहेत. हि स्फोटके देखील आरोपींनी चोरी करून आणली असून ती विक्रीसाठी घेऊन येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या प्रकरणी स्थानिक निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया चालु आहे. सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, भिवंडी युनिट- २ च्या पथकाने केली आहे.