भिवंडीत हुंड्यासाठी विवाहितेचा छळ, सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 02:07 AM2019-10-04T02:07:38+5:302019-10-04T02:07:55+5:30
लग्नानंतर पाच महिन्यांतच पती व सासरच्या मंडळींनी विवाहितेने माहेरहून पाच लाख आणावेत, यासाठी विवाहितेला मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केल्याने तिने पतीसह सासरच्या सहा जणांविरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
भिवंडी : लग्नानंतर पाच महिन्यांतच पती व सासरच्या मंडळींनी विवाहितेने माहेरहून पाच लाख आणावेत, यासाठी विवाहितेला मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केल्याने तिने पतीसह सासरच्या सहा जणांविरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पती राजेश भालेराव, सासू इंदुबाई भालेराव, सासरा सुदाम भालेराव, दीर पांडुरंग भालेराव, पोपट भालेराव, नणंद सीमा कांबळे अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत. कोनगाव येथील करु णा वाघमारे (२१) हिचा विवाह १९ मे २०१९ रोजी पुणे जिल्ह्यातील मौजे कामशेत येथील राजेश याच्याशी झाला. विवाहानंतर करुणा पाच परतवणीसाठी माहेरी आली होती.
त्यावेळी नणंद सीमा हिने मोबाइलवरून संपर्कसाधून तू सासरी येताना तुझ्या पतीला अॅम्ब्युलन्स घ्यायची आहे, त्यासाठी वडिलांकडून पाच लाख घेऊन ये, असे सांगितले. त्यावर करु णा हिने माझ्या वडिलांच्या आजारपणावर खूपच पैसे खर्च झाले आहेत. त्यामुळे मी पैसे आणू शकत नाही, असे सांगितले. त्यानंतर, करु णा सासरी नांदण्यास गेली. दोन महिन्यांनी करु णाच्या आईवडिलांनी तिला पंचमी सणासाठी २ आॅगस्ट रोजी माहेरी आणले. १२ आॅगस्ट रोजी करु णा हिच्या पतीने कामशेत पोलीस ठाण्यात करुणा व तिच्या आईवडिलांच्या विरोधात तक्र ार देऊन स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी करुणाचा भाऊ अक्षय वाघमारे हा सासरच्या मंडळींची समजूत काढण्यासाठी कामशेत येथे गेला असता, त्याच्याकडेही पाच लाखांची मागणी केली. त्यानंतर, पाच लाख देण्याची ऐपत नसल्याचे करु णा हिने वेळोवेळी सांगितल्याने पती व सासरच्या मंडळीने शिवीगाळ व दमदाटी करून करूणा हिला मारहाणही केली. त्यामुळे छळाला कंटाळून अखेर करु णा हिने भिवंडीतील माहेर गाठले व पती राजेश याच्यासह सासू, सासरा, दीर, नणंद आदी सहा जणांविरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, सासरच्या मंडळींविरोधात तातडीने कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.