पोलिसांनी आवळल्या अट्टल चोरट्यांच्या मुसक्या; लाखोंचे महागडे मोबाईल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2021 07:02 PM2021-06-06T19:02:40+5:302021-06-06T19:06:21+5:30
पोलिसांच्या तावडीत सापडलेल्या आरोपी अमनची अधिक चौकशी केली असता त्याने आपल्या साथीदारासोबत मोबाईल हिसकावून पळ काढल्याची कबुली दिली.
भिवंडी ( दि.६ ) भिवंडी शहरात अनलॉक काळापासून चोरट्यांनी धुमाकूळ घालत लाखोंचे महागडे मोबाईलसह रेडिमेड कपड्याची चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या अट्टल चोरट्यांच्या मुसक्या आवळ्यात भिवंडी शहर पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे या चोरट्यांकडून दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. अमन सुलतान मोमीन (वय १९ रा. समदनगर ) जैद अब्दुल खालीक अन्सारी ( वय २३ रा. इस्लामपुरा ) आणि मायकल ( वय १९) असे अटक केलेल्या चोरट्यांची नावे असून त्यांच्याकडून आतापर्यत एकूण ५ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
जगदीश हिराजी देसले (वय ३२) हे कामानिमित्ताने १७ मार्च २०२१ रोजी भिवंडीतील ताडाळी जकात नाकामार्गे पाईपलाईन रोडने पायी जात होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या २ चोरट्यांनी त्यांना लाकडी दांडक्याचा धाक दाखवून त्यांच्या खिशातून १० हजार ६०० रुपयांचा मोबाईल हिसकवून पळ काढला. त्यांनतर त्यांनी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात त्या २ चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. सदर चोरीचा गुन्हा दाखल होताच पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण, सहा पोलीस आयुक्त किसन गावीत आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय कांबळे यांनी पोलीस तपास पथकासह या चोरट्यांचा शोध सुरु केला असता गुप्त बातमीदाराच्या मदतीने मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी अमन व त्याचा एक साथीदार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांचा शोध घेऊन आरोपी अमनला भिवंडीतून अटक केली.
पोलिसांच्या तावडीत सापडलेल्या आरोपी अमनची अधिक चौकशी केली असता त्याने आपल्या साथीदारासोबत मोबाईल हिसकावून पळ काढल्याची कबुली दिली. त्यांनतर त्याला पोलीस कोठडी सुनावली असता पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने आतापर्यत एकुण ३६ मोबाईल लंपास केल्याची कबुली दिली. सदर मोबाईलची किमंत ४ लाख ७० हजार रूपये असून सर्व मोबाईल त्याच्याकडुन हस्तगस्त करीत त्याने गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही पोलिसांनी जप्त केली आहे असा एकुण ५ लाख १० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दुसऱ्या गुन्ह्यातील आरोपी जैद अब्दुल खालीक अन्सारी व मायकल याही चोरट्याचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता फ्लिपकार्ड कंपनीच्या गोडावुनमधुन त्यांनी लंपास केलेले शर्ट, पॅन्ट, शर्ट पिस, कोट, लॅपटॉप कवर, मोबाईल कवर, फेस शिल्ड, एल सी डी स्टॅन्ड असा एकुण ५४ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच आणखी काही मुद्देमाल त्यांनी कोठून चोरला आहे का ? याचा तपास पोलिसांनी सुरु केला. तर या गुन्हयातील २ आरोपी अजूनही फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे यांनी दिली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दिपेश किणी करीत आहेत.