Nupur Sharma : नुपूर शर्मा यांना भिवंडी पोलिसांनी पाठवलं समन्स, जबाब नोंदवण्यास बोलावले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2022 07:14 PM2022-06-12T19:14:10+5:302022-06-12T19:46:43+5:30
Nupur Sharma : नुपूर शर्मा यांना आता मुंबईतील भिवंडी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी समन्स बजावले असून, १३ जून रोजी जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्यास सांगितले आहे.
ठाणे : मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या नुपूर शर्मा यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. हा वाद वाढल्यानंतर भारतीय जनता पक्षाने आधी निलंबनाची कारवाई केली आणि आता विविध पोलीस ठाण्याचे पोलीस नोंद झालेल्या गुन्ह्यांमध्ये जबाब नोंदवण्यासाठी समन्स पाठवत आहेत. नुपूर शर्मा यांना आता मुंबईतील भिवंडी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी समन्स बजावले असून, १३ जून रोजी जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्यास सांगितले आहे.
मुंबईतील भिवंडीपोलिसांनी नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांना समन्स बजावून त्यांचे जबाब नोंदवण्यास सांगितले आहे. भिवंडी पोलिसांनी नुपूर शर्मा यांना १३ जून आणि नवीन जिंदाल यांना २५ जूनला हजर राहण्यास सांगितले आहे. प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी भिवंडी पोलिसांनी दोन्ही नेत्यांना समन्स बजावले आहे.
यापूर्वी मुंबईतील पायधुनी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनीही समन्स बजावले होते. नुपूर शर्माला पायधुनी पोलिसांनी 25 जूनला तिचा जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्यास सांगितले होते. रझा अकादमीच्या तक्रारीवरून मुंबईतील पायधुनी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी नुपूर शर्मा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी रझा अकादमीने नुपूर शर्मा यांच्याविरोधात तक्रार दिली होती.
मुंब्रा पोलिसांनी २२ जूनला समन्स बजावले
प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे नुपूर शर्मा यांच्यावर अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी नुपूर शर्मा यांच्याविरुद्ध ठाणे, मुंबई येथेही गुन्हा दाखल केला आहे. गुफरान खान नावाच्या शिक्षकाच्या तक्रारीवरून मुंब्रा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी नुपूर शर्मा यांच्याविरुद्ध भादंवि कलम १५३ अ आणि ब, २९५ अ, २९८ आणि ५०५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. मुंब्रा पोलिसांनी नुपूर शर्माला 22 जून रोजी समन्स बजावले आहे.