Crime News: भरतपूरमधून अपहरण अन् भिवानीमध्ये खून! गाडीत आढळले जळालेले सांगाडे, जाणून घ्या प्रकरण...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 02:40 PM2023-02-17T14:40:35+5:302023-02-17T14:41:50+5:30
Crime News: दोन तरुणांना गौ तस्करीच्या संशयात हत्या करुन जाळण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
Crime News: हरियाणातील भिवानीमध्ये गुरुवारी जळून खाक झालेल्या बोलेरो गाडीत दोन सांगाडे सापडल्याने हरियाणापासून राजस्थानपर्यंत एकच खळबळ उडाली. मृत दोन्ही राजस्थानमधील भरतपूर येथील रहिवासी आहेत. दोघांचे भरतपूर येथून अपहरण करुन भिवानी येथे हत्या केल्याचा आरोप आहे. मृतांच्या नातेवाईकांनी बजरंग दलाच्या 5 कार्यकर्त्यांवर अपहरण आणि हत्येचा आरोप केला आहे. यामध्ये मोनू मानेसरच्या नावाचाही समावेश आहे. हे संपूर्ण प्रकरण गौ तस्करीशी संबंधित असल्याचे मानले जात आहे. मात्र, अद्याप पोलिसांनी यावर कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
16 फेब्रुवारी रोजी हरियाणातील भिवानी येथील बरवस गावाजवळ जळालेल्या बोलेरोमध्ये दोन सांगाडे सापडले होते. नसीर (25) आणि जुनैद (35) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही राजस्थानमधील भरतपूर येथील रहिवासी आहेत. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी भरतपूर येथून दोघांचे अपहरण करुन हत्या केल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. भरतपूरपासून सुमारे 200 किमी अंतरावर असलेल्या भिवानी येथील लोहारू येथे दोघांचे मृतदेह सापडले. जुनैदवर गौ तस्करीचे 5 गुन्हे दाखल आहेत. तर, नसीरचा कुठल्याही गुन्ह्याशी संबंध नाही.
मृताच्या चुलत भावाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मोनू मानेसर, अनिल, श्रीकांत, रिंकू सैनी, लोकेश सिंगला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हे सर्व बजरंग दलाचे कार्यकर्ते असून स्वतःला गोरक्षक म्हणवतात. मृताचा चुलत भाऊ खालिद याने बुधवारी गोपाळगड पोलीस ठाण्यात दोन जणांचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली. खालिदच्या तक्रारीनुसार, त्याचे दोन चुलत भाऊ जुनैद आणि नसीर हरियाणातील फिरोजपूर येथे काही कामासाठी निघाले होते.
यादरम्यान त्यांचे अपहरण आणि हत्या झाली. तो आपल्या कुटुंबीयांसह गोपालगडमधील पिरुका जंगलात भावाच्या शोधासाठी पोहोचला तेव्हा त्याला जळालेली कार आढळली आणि त्यात दोघांचे जळून खाक झालेले मृतदेह होते. हरियाणातील रहिवासी अनिल, श्रीकांत, रिंकू सैनी, लोकेश सिंगला, मोनू हे बोलेरो कारमध्ये बसलेल्या दोघांशी भांडत असल्याचे स्थानिक लोकांनी सांगितल्याचे खालिदने पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी आतापर्यंत काय कारवाई केली?
याप्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम 143, 365, 367, 368 अन्वये गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे. या प्रकरणी अर्धा डझन जणांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत आहे. मात्र, या प्रकरणाचा गाईच्या तस्करीशी संबंध आहे की नाही, हे तपासानंतरच कळेल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या प्रकरणावर शोक व्यक्त करत पोलिसांना कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.