कल्याणमध्ये भोंदूबाबाला पोलिसांनी केली अटक; महिलेकडून ५ लाखांची उकळलेली रक्कम
By मुरलीधर भवार | Published: November 16, 2022 05:08 PM2022-11-16T17:08:31+5:302022-11-16T17:08:38+5:30
शहराच्या पश्चिम भागातील कोळीवाडा परिसरात आरिफा मुलानी ही महिला राहते. तिचा दीर हा मानसिक आजारी आहे.
कल्याण- एका महिलेच्या दीरावर उपचार करण्याच्या नावाखाली जादूटोणा करणा:या भोंदूबाबाला कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. या भोंदूबाबाचे नाव आसिफ आरिफ हिंगोरा असे आहे. या भोंदूबाबाने महिलेकडून पाच लाख रुपयांची रक्कम उकळली आहे.
शहराच्या पश्चिम भागातील कोळीवाडा परिसरात आरिफा मुलानी ही महिला राहते. तिचा दीर हा मानसिक आजारी आहे. त्याच्यावर उपचार करुन देखील तो बरा होत नसल्याने मुलानी कुटुंब त्रस्त होते. मुलानी यांची काही दिवसापूर्वी आसिफ आरिफ हिंगोरा याच्यासोबत ओळख झाली. त्याला या महिलेने तिचा दीर आजारी असून त्याच्यावर उपचार करायचे आहे असे सांगितले. त्यावर हिंगोरा याने सांगितले की, तुझ्या दीराचा आजार मी बरा करतो. जादूटोण्याच्या सहाय्याने दीराचा आजार बरा करण्यात येईल असे हिंगोरा यांनी सांगितले. त्याबदल्यात महिलेकडून टप्प्या टप्प्याने दोन पाच लाख रुपये घेतले. महिलेने त्याला पाच लाख रुपये दिले. मात्र दीराचा आजार काही बरा झाला नाही.
दीराचा आजार बरा होत नसल्याने महिलेला संशय आला की हिंगोरा याने तिची आर्थिक फसवणूक केली आहे. महिलेने बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रार दिल्याचे कळचात हिंगारा हा पसार झाला होता. बाजारपेठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक नरेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोरा याच्या तपासाकरीता चक्रे फिरविण्यात आली. पोलिसांनी हिंगोरा याला अटक केली आहे. हिंगोरा याच्या विरोधात जादूटोणा कायदयान्वये गुन्हा दाखल केला आहे. हिंगोरा हा ठाणे घोडबंदर परिसरात राहतो. हिंगोरा याने अन्य किती लोकांना जादूटोण्याच्या नावाखाली गंडा घातला आहे. याचा तपास पोलिसानी सुरु केला आहे. हिंगोरा याच्या अटकेची माहिती पोलिसांनी त्याच्या पत्नीला दिली आहे.