CRPF जवानाने पत्नीवर गोळ्या झाडल्या; पोलिसांना कॉल केला, त्यानंतर स्वत:ही केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 14:50 IST2025-01-30T14:50:24+5:302025-01-30T14:50:47+5:30
सध्या पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

CRPF जवानाने पत्नीवर गोळ्या झाडल्या; पोलिसांना कॉल केला, त्यानंतर स्वत:ही केली आत्महत्या
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका सीआरपीएफ जवानाने आपल्या पत्नीची गोळ्या घालून हत्या केली. त्यानंतर याबाबत पोलिसांना फोन करून माहिती दिली आणि स्वतः देखिल जवानाने आत्महत्या केली. या घटनेनंतर घटनास्थळी पोलीस दाखल आहेत. सध्या पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री १.३० च्या सुमारास मिसरोड पोलिस स्टेशन परिसरातील बांगरासिया येथे ही घटना घडली. सीआरपीएफ जवान रविकांत वर्मा यांनी आपल्या पत्नीवर दोन गोळ्या झाडल्या. यानंतर, त्यांनी स्वत: पोलीस नियंत्रण कक्ष आणि डायल १०० वर कॉल केला आणि सांगितले की, पत्नीची हत्या केली आहे. यानंतर त्यांनी स्वतःलाही गोळ्या झाडून संपविले.
घटनेच्या वेळी सीआरपीएफ जवान रविकांत हे दारूच्या नशेत होते. दारू पिण्यावरून पती-पत्नीमध्ये भांडण झाले. यानंतर सीआरपीएफ जवान रविकांत यांनी हे भयानक पाऊल उचलले, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, ज्यावेळी पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यावेळी त्यांना घरात रक्ताने माखलेले मृतदेह पडलेले दिसले. यानंतर पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. तसेच, खून आणि आत्महत्येचा तपास सुरू केला आहे.
दोघांमध्ये वारंवार वाद
सीआरपीएफ जवान रविकांत वर्मा आणि त्यांची पत्नी रेणू वर्मा हे मूळचे भिंडचे रहिवासी होते. ते भोपाळमधील सीआरपीएफ कॅम्पजवळील सिव्हिल कॉलनीत राहत होते. रविकांत आणि रेणू यांनाही दोन मुलेही आहेत. ६ वर्षांचा मुलगा आणि २.५ वर्षांची मुलगी आहे. घटनेच्या वेळी दोन्ही मुले घरातील दुसऱ्या खोलीत होती. गोळीबाराचा आवाज ऐकून शेजारीही घरात पोहोचले. दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याचे शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितले.