धक्कादायक! बहिणीचं कर्ज फेडण्यासाठी अग्निवीर जवानाने ज्वेलर्सच्या दुकानातून लुटले ५० लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 09:20 AM2024-08-19T09:20:05+5:302024-08-19T09:36:53+5:30
अग्निवीर जवान या दरोड्यातील मुख्य आरोपी असून तो सध्या पठाणकोट येथे तैनात आहे. सध्या तो भोपाळला त्याच्या बहिणीच्या घरी सुट्टीसाठी आला असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील बागसेवानिया भागात एका ज्वेलर्सच्या दुकानात ५० लाखांहून अधिक रुपयांच्या दरोड्याप्रकरणी पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्निवीर जवान या दरोड्यातील मुख्य आरोपी असून तो सध्या पठाणकोट येथे तैनात आहे. सध्या तो भोपाळला त्याच्या बहिणीच्या घरी सुट्टीसाठी आला असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
भोपाळचे पोलीस आयुक्त हरिनारायणाचारी मिश्रा यांनी सांगितलं की, दरोड्याचे मास्टरमाईंड आकाश राय आणि मोहित सिंह बघेल हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहित सिंह बघेल हा भारतीय लष्करातील अग्निवीर जवान असून सध्या पठाणकोटमध्ये तैनात आहे. भोपाळ पोलिसांनी मोहित सिंह बघेलबद्दल लष्कराकडूनही माहिती मागवली आहे.
गेल्या मंगळवारी भोपाळच्या बागसेवनिया भागात दोन जणांनी ज्वेलरी शॉपमध्ये घुसून दुकान मालकाला बंदुकीच्या धाक दाखवून लुटलं होतं. यावेळी एका आरोपीने दुकानदारावर चाकूने हल्ला केला, या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. यानंतर दोन्ही आरोपींनी दुकानात ठेवलेले दागिने व रोख रक्कम घेऊन पळ काढला.
पोलिस आयुक्तांनी सांगितलं की, घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींना पकडण्यासाठी ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. चार वेगवेगळी पथकं तयार करण्यात आली. घटनास्थळाच्या २० किलोमीटरच्या परिसरातील ४०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यात आले.
सीसीटीव्ही फुटेजवरून मोहित सिंह बघेल या तरुणाची ओळख पटली असून त्याची कसून चौकशी केली असता त्याने दरोडा घातल्याचं कबुल केल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. मोहित सिंह बघेलने दिलेल्या माहितीनुसार, तो भारतीय सैन्यात अग्निवीर आहे. तो बागसेवानिया परिसरात राहणाऱ्या त्याच्या बहिणीच्या घरी आला होता.
मोहितची कसून चौकशी केली असता त्याने आपल्या बहिणीचं कर्ज फेडण्यासाठी आणि उरलेल्या रकमेतून मजा करायची या उद्देशाने दरोड्याचा कट रचल्याची कबुली दिली असल्याचं पोलिस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहितने रात्री दुकानात फेरफटका मारला होता. यानंतर हा प्लॅन केला. दोघांनी लुटलेले पैसे आणि दागिने वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवले होते.