जंगलात सापडलेलं ५२ किलो सोनं अन् ११ कोटी रोकड कुणाची?; तपास यंत्रणांची चौकशी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 18:19 IST2025-01-28T18:16:06+5:302025-01-28T18:19:23+5:30
२७ जानेवारीला सौरभने भोपाळ कोर्टात सरेंडर करण्याचा अर्ज केला. त्याची पत्नी दिव्या त्याच दिवशी ईडी कार्यालयात पोहचली.

जंगलात सापडलेलं ५२ किलो सोनं अन् ११ कोटी रोकड कुणाची?; तपास यंत्रणांची चौकशी सुरू
भोपाळ - कोट्याधीश माजी आरटीओ कॉन्स्टेबल सौरभ शर्मा ज्याच्यावर आयकर विभाग, ED आणि लोकायुक्तांची संयुक्त कारवाई सुरू आहे. २८ जानेवारीला ईडीने सौरभ शर्माला अटक केली. त्यानंतर सौरभचा मित्र चेतन गौर यालाही ताब्यात घेतले आहे. आता सौरभ आणि चेतन यांची लोकायुक्त मुख्यालयात समोरासमोर बसवून चौकशी केली जात आहे. दुसरीकडे सौरभची पत्नी दिव्या तिवारीचा २७ जानेवारीला ईडीने जबाब नोंदवून घेतला. सौरभ दुबईहून परतल्यानंतर भारतात वेगवेगळ्या ठिकाणी भटकत होता असंही तपासात समोर आलं आहे.
दुबईहून आल्यानंतर सौरभ हरिद्वार, ऋषिकेश आणि वैष्णोदेवीसारख्या धार्मिक स्थळांवर गेला. याच काळात तपास यंत्रणा त्याचा शोध घेत होती. सौरभच्या एका मित्राच्या कारमधून ५२ किलो सोने आणि ११ कोटी रोकड जप्त केली होती. त्यानंतर सौरभ तपास यंत्रणांच्या रडारवर आला. भोपाळच्या परिवहन विभागात कॉन्स्टेबल असणाऱ्या सौरभची संपत्ती पाहून सगळे अधिकारी हैराण झाले होते. त्याच्याकडे उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती असल्याचा आरोप झाला होता.
लोकायुक्त, आयकर विभाग, ईडीसारख्या ३ बड्या तपास यंत्रणा सौरभ शर्मावर लक्ष ठेवून होत्या. नोकरीचा दुरुपयोग करून बेकायदेशीर मालमत्ता जमावल्याचा सौरभवर आरोप आहे. या प्रकरणी सौरभच्या घरी तपास यंत्रणांनी धाड टाकली होती. परंतु त्याच्या मित्राच्या कारमधून ५२ किलो सोने आणि ११ कोटी रोकड जप्त झाल्याने अधिकाऱ्यांची झोप उडाली. १६ डिसेंबरला ही घटना घडली होती. त्यानंतर सौरभ आणि त्याची पत्नी दिव्या दुबईला पळून गेले होते. २३ डिसेंबरला दोघेही भारतात परतले. मात्र तपास यंत्रणांपासून वाचण्यासाठी ते दररोज त्यांचा ठिकाणा बदलत राहिले.
दरम्यान, २७ जानेवारीला सौरभने भोपाळ कोर्टात सरेंडर करण्याचा अर्ज केला. त्याची पत्नी दिव्या त्याच दिवशी ईडी कार्यालयात पोहचली. दुबईहून परतल्यानंतर हे जोडपे उत्तराखंडच्या विविध शहरात राहत होते. सौरभच्या वकिलांनी त्याला सरेंडर होण्याचा सल्ला दिला होता. लोकायुक्तने सौरभवर भ्रष्टाचाराचा खटला दाखल केला आहे तर ईडीने त्याच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे ज्यात त्याला दीर्घकाळ चौकशीचा ससेमिरा मागे लागू शकतो.