"चव्हाण म्हणाले होते, तुझ्या वडिलांची ४-५ वर्षे जेलमध्ये वाट लावून टाकतो" 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 10:22 AM2023-01-17T10:22:55+5:302023-01-17T10:23:10+5:30

बीएचआर ठेवीदारांचे पैसे परत करण्यास असमर्थ ठरल्यामुळे २७ ऑक्टोबर २०१५ मध्ये लिक्वीडेटर जितेंद्र कंडारे याची नेमणूक करण्यात आली होती.

BHR Scam: "Chavan had said, wait for your father in jail for 4-5 years" | "चव्हाण म्हणाले होते, तुझ्या वडिलांची ४-५ वर्षे जेलमध्ये वाट लावून टाकतो" 

"चव्हाण म्हणाले होते, तुझ्या वडिलांची ४-५ वर्षे जेलमध्ये वाट लावून टाकतो" 

Next

पुणे :  बीएचआर घोटाळा प्रकरणात १ कोटी २२ लाख रुपये खंडणी उकळल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी तत्कालीन विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. 

याप्रकरणी सुरज सुनील झंवर (वय ३१, रा. जळगाव) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बीएचआरच्या गुन्ह्यात झंवर यांना जामीन मिळण्याकामी सहकार्य करेन. पैसे दिले नाही तर तुन्हा दोघांना नुकसान पोहचवेन. जामीन मिळवून देणार नाही. तसेच कोथरुडमधील गुन्ह्यात फिर्यादी यांना अडकविण्याची धमकी देऊन २ कोटी रुपयांची मागणी केली. त्यातील १ कोटी रुपये चव्हाण यांनी स्वत:कडे ठेवले व २० लाख रुपये उदय पवार याने मध्यस्थ म्हणून स्वत:साठी घेतले व २ लाख रुपये हवाल्याच्या मोबदला म्हणून चाळीसगाव येथील ओरिजनल वाईन शॉप येथे २६ नोव्हेबर २०२१ रोजी घेतले. तसेच जामिनासाठी मदत केली नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

बीएचआर ठेवीदारांचे पैसे परत करण्यास असमर्थ ठरल्यामुळे २७ ऑक्टोबर २०१५ मध्ये लिक्वीडेटर जितेंद्र कंडारे याची नेमणूक करण्यात आली होती. कर्जदारांच्या मालमत्ता जप्त करुन त्या जाहीर ई लिलावाद्वारे विकून ठेवीदारांची देणी परत करण्याची कार्यवाही करत असताना कंडारे याने सुनील झंवर व इतरांशी संगनमत करुन ठेवीदारांकडून ठेवीच्या पावत्या कमी किंमतीत घेऊन त्यात भष्ट्राचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेने जळगावात छापे घालून अनेकांना ताब्यात घेत टेम्पो भरुन कागदपत्रे जप्त केली होती. प्रवीण चव्हाण यांची विशेष सरकारी वकील म्हणून तर फॉरेन्सिक ऑडिटर म्हणून शेखर सोनाळकर यांची नेमणूक करण्यात आली होती. 

सुनिल झंवर यांना १० ऑगस्ट २०२१ रोजी अटक करण्यात आली. त्यांच्या जामिनासाठी प्रवीण चव्हाण यांनी वेळोवेळी विरोध केला. ११ ऑगस्ट २०२१ रोजी चव्हाण यांनी त्रयस्थामार्फत फिर्यादीला निरोप दिला की, तुझ्या वडिलांची ४-५ वर्षे जेलमध्ये वाट लावून टाकतो, मी या पूर्वी सुरेशदादा जैन, डीएसकेचे कुलकर्णी व इतर आरोपींची देखील वाट लावलेली आहे. तुमच्या कुटुंबीयांची जप्त केलेली बँक खाती पुढील १० वर्षात मुक्त होऊ देणार नाही, तेव्हा काही तर पूर्तता कर, तरच फायदा होईल, अन्यथा आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल अशी धमकी दिली. त्यानंतर फिर्यादी यांनी २६ नोव्हेबर २०२१ रोजी उदय पवार याच्याकडे १ कोटी २२ लाख रुपयांची खंडणी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. झंवर यांना २२ फेब्रुवारी २०२२ रोजी जामीन मिळाला. त्यानंतर फिर्यादी यांनी वडिलांना खंडणीविषयी सांगितले. त्यानंतर त्यांनी उदय पवार याच्याशी संपर्क साधला. त्याने चव्हाण याच्याशी संपर्क साधल्यावर तुझे बँक खाते कसे ओपन होते ते पाहतो, तुला इतर दोन केसमध्ये देखील तोंड द्यावे लागेल, अशी धमकी दिली.

आमची सर्व बँक खाती गोठविण्यात आली होती. वडील तुरुंगात होते. तसेच ते आणखी गुन्हे दाखल करतील अशी भीती होती. या सर्व बाबींमध्ये आम्ही सर्व जण त्रस्त होतो, त्यामुळे आणखी गुन्हे नकोत, म्हणून इतके दिवस घाबरून बोललो नाही. आता हिंमत करून पोलिसांकडे फिर्याद दिली आहे -सूरज सुनील झंवर, फिर्यादी.

देवेंद्र फडणवीस यांनी केला होता गौप्यस्फोट
उपमुख्यमंत्री व तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ९ मार्च २०२२ रोजी विधानसभेत पेन ड्राइव्ह सादर करून एकच खळबळ उडवली होती. त्यात प्रवीण चव्हाण हे लोकांना ब्लॅकमेल करून खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकविण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांना दबावतंत्र वापरतात व आपल्या पदाचा गैरवापर करतात, याचे रेकॉर्डिंग सादर केले होते. त्यानंतर चव्हाण यांनी विशेष सरकारी वकील पदाचा राजीनामा सादर केला होता. या प्रकरणानंतर फिर्यादी सूरज झंवर हे जून २०२२ मध्ये तेजस मोरे यांना भेटले. तेव्हा प्रवीण चव्हाण यांनी आपल्याला फसवले व पैसे घेऊनही मदत केली नाही, असे मोरे यांनी सांगितले. १ ऑडिओ व व्हिडीओ क्लिप दिली. प्रवीण चव्हाण हे कोथरुड पोलिस ठाण्यातील गुन्ह्यात कशा पद्धतीने फिर्यादी यांच्या फ्लॅटवर चाकू ठेवण्याचा प्लॅन इतरांना सांगत होते, हे संभाषण असल्याचे सूरज चव्हाण यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.

Web Title: BHR Scam: "Chavan had said, wait for your father in jail for 4-5 years"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.