बीडच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यास पाच लाखांची लाच घेताना पकडले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2019 05:37 AM2019-02-03T05:37:01+5:302019-02-03T05:37:31+5:30
शासकीय धान्य गोदामाच्या चौकशीत दोषी असलेल्या गोडाऊन किपरला सहकार्य करण्यासाठी आणि त्याच्या बाजूने निकाल देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच घेताना बीडचे अप्पर जिल्हाधिकारी बी.एम. कांबळे आणि बीड तहसीलचा अव्वल कारकून महादेव महाकुडे यांना शनिवारी सकाळी रंगेहाथ पकडण्यात आले.
बीड : शासकीय धान्य गोदामाच्या चौकशीत दोषी असलेल्या गोडाऊन किपरला सहकार्य करण्यासाठी आणि त्याच्या बाजूने निकाल देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच घेताना बीडचे अप्पर जिल्हाधिकारी बी.एम. कांबळे आणि बीड तहसीलचा अव्वल कारकून महादेव महाकुडे यांना शनिवारी सकाळी रंगेहाथ पकडण्यात आले.
बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. बीडच्या शासकीय धान्य गोदामात २०१४-१५ मध्ये घोटाळा झाला होता. त्यात गोडाऊन किपरला दोषी ठरवित त्याचे निलंबन झाले होते. त्यानंतर प्रकरणाची चौकशी अप्पर जिल्हाधिकारी बी. एम. कांबळे यांच्याकडे सोपविण्यात आली होती. कांबळे यांनी तक्रारदाराकडे १० लाख रूपयांची मागणी केली होती. मध्यस्थी म्हणून महाकुडे काम पाहत होता.
कांबळे यांचा ‘आर्थिक’ व्यवहार शासकीय निवासस्थानातूनच चालत होता. कांबळे यांचे औरंगाबाद व मुळ गाव असलेल्या नांदेडमध्ये घर व मालमत्ता आहे. तेथेही झडती घेण्यासाठी पथके पाठविण्यात आली. महाकुडेच्या तळेगाव (ता.बीड) येथील घराची झडती घेण्यात आली.
शेगावचा मुख्याधिकारी, रोखपालास अटक
शेगाव (बुलडाणा): निवासी प्लॉटची वाणिज्यविषयक नोंद करण्यासाठी पाच लाखांची लाच मागणारे शेगाव मुख्याधिकारी मुख्याधिकारी अतुल पंत आणि रोखपाल आर. पी. इंगळे यांना अटक करण्यात आली. एका हॉटेलमध्ये इंगळे यांना १ लाख २० हजारांची रक्कम स्वीकारताना पकडण्यात
आले.