आयकर विभागाची मोठी कारवाई! स्टील कंपन्यांवरील छाप्यातून ३०० कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 09:40 PM2021-09-27T21:40:49+5:302021-09-27T21:42:04+5:30
Big action of income tax department : आयकर विभागाची कारवाई : मुंबई, जालना, औरंगाबाद, कोलकता येथे छापे
मुंबई : आयकर विभागाने जालनास्थित चार मोठ्या स्टील रोलिंग कारखान्यांच्या एका उद्योग समूहावर टाकलेल्या छाप्यातून ३०० कोटींहून अधिक बेहिशेबी मालमत्ता असल्याचे स्पष्ट झाले आहे, तसेच या कंपन्यांचे ७१ कोटींचे अतिरिक्त उत्पन्न असल्याचे तपासून उघड झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
आयकर विभागाने २३ सप्टेंबरला स्टीलचे टीएमटी बार्स आणि बिलेटस् म्हणजेच छर्रे बनविण्याच्या उद्योगात असलेल्या कंपन्यांच्या जालना, औरंगाबाद, पुणे, मुंबई आणि कोलकता येथे छापे टाकले होते. एकाचवेळी स्वतंत्र पथकाद्वारे केलेल्या या कारवाईत गैरव्यवहारांसंबंधी अनेक कागदपत्रे, सुटे कागद आणि इतर डिजिटल पुरावे जप्त केले आहेत. या कागदपत्रांच्या तपासणीतून या कंपन्या मोठ्या प्रमाणात बेहिशेबी आर्थिक व्यवहारात गुंतल्या असल्याचे स्पष्ट होत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. यातील अनेक व्यवहारांची कुठल्याही अधिकृत कागदपत्रांवर नोंद नाही. या ठिकाणी आढळलेल्या इतर पुराव्यांनुसार या कंपन्यांनी बनावट कंपन्या आणि शेअर प्रीमियमच्या माध्यमातून मोठ्या बेहिशेबी रकमेचा गैरव्यवहारही उघड झाला आहे. २०० कोटींची अतिरिक्त खरेदी लक्षात आली असून, हिशेब नसलेला बराच मोठा मालही कारखाना परिसरात सापडला आहे. आतापर्यंतच्या छाननीतून ३०० कोटींहून अधिक मूल्याची बेहिशेबी मालमत्ता समोर आली असून, चार कंपन्यांचे ७१ कोटींचे अतिरिक्त उत्पन्न समोर आले आहे. याप्रकरणी अजूनही तपास सुरू आहे.
कारवाईतून हे केले जप्त
आयकर विभागाने एकाचवेळी केलेल्या उद्योग समूहावरील छाप्यातून १२ बँक लॉकर उघडकीस आले आहेत, तसेच २.१० कोटी बेहिशेबी रोख आणि १.०७ कोटींचे दागिने अधिकाऱ्यांनी जप्त केले आहेत.