घरफोडीचे सत्र रोखण्याचे मोठे आव्हान, एकाच सोसायटीमध्ये दोन महिन्यांत ११ घरांमध्ये चोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2020 01:46 AM2020-12-06T01:46:35+5:302020-12-06T01:47:01+5:30
Crime News : नवी मुंबईमध्ये आतापर्यंत सर्वात सुरक्षित वसाहत म्हणून सीबीडी परिसराची ओळख होती. परंतु मागील काही महिन्यांपासून सीबीडीची ओळख बदलू लागली आहे. या परिसरात चोरी व घरफोडीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्या आहेत.
नवी मुंबई : सीबीडी बेलापूरमधील बी टेन टाइप गृहनिर्माण सोसायटीमधील ११ घरांमध्ये दोन महिन्यांत चोरी झाली आहे. घरफोडीचे सत्र थांबत नसल्यामुळे व झालेल्या चोरीचा तपास लागत नसल्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभे केले जात असल्यामुळे चोरीचे सत्र थांबविण्याचे व गुन्ह्यांचा तपास करून मुद्देमाल हस्तगत करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
नवी मुंबईमध्ये आतापर्यंत सर्वात सुरक्षित वसाहत म्हणून सीबीडी परिसराची ओळख होती. यामुळे अनेक नामवंत कलाकार व इतर मान्यवर व्यक्तींनी या परिसरात घर घेणे पसंत केले आहे, परंतु मागील काही महिन्यांपासून सीबीडीची ओळख बदलू लागली आहे. या परिसरात चोरी व घरफोडीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्या आहेत. येथील सेक्टर ३ मधील बी टेन टाइप इमारतीमध्ये राहणारे गजानन भंडारे हे ४ ऑक्टोबरला त्यांच्या वडिलांची प्रकृती ठीक नसल्यामुळे कामोठे येथे त्यांची चौकशी करण्यासाठी गेले होते. सकाळी घरी आले असता, त्यांच्या घरामध्ये चोरी झाल्याचे निदर्शनास आले. आयुष्यभर कष्ट करून कमावलेले दागिने व १ लाख ६० हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ९ लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. चोरीला गेलेल्या दागिन्यांची बाजारभावाप्रमाणे तुलना केली, तर हे दागिने जवळपास १५ लाख रुपये किंमत होते. या प्रकरणी सीबीडी पोलीस स्टेशनमध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन महिने झाल्यानंतरही अद्याप चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना अपयश आले आहे.
सेक्टर ३ मधील बी टेन टाइप वसाहतीमध्ये फक्त भंडारे यांच्या घरामध्ये चोरी झाली, त्या दिवशी एकूण तीन घरे फोडण्यात आली. त्यापूर्वीही तीन घरांमध्ये चोरी झाली होती. यानंतर, ११ नोव्हेंबरला पुन्हा तीन घरांमध्ये चोरी झाली. १ डिसेंबरला त्याच सोसायटीमध्ये २ घरांमध्ये चोरी झाली. जवळपास दोन महिन्यांत एकाच सोसायटीमध्ये तब्बल ११ घरांमध्ये चोरी झाल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्व प्रकारामध्ये चोरी करण्याची पद्धत एकसारखी असल्याचे निदर्शनास आले आहे. सोसायटीमधील सीसीटीव्हीमध्ये काही फुटेजही सापडले आहे. अद्याप चोरीच्या घटनांमधील आरोपी पोलिसांना सापडला नाही. या सर्व गुन्ह्यांचा तपास करावा व घरफोडीचे सत्र थांबवून रहिवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
घरफोडीमध्ये ३० तोळे सोने व रोख रक्कम चोरीला गेली. या घटनेला दोन महिने झाले आहेत. चोरीच्या घटनेमुळे आर्थिक नुकसान झालेच, त्याचबरोबर परिवारातील सर्वांना मानसिक धक्काही बसला आहे. तपास लवकर लागला व मुद्देमाल परत मिळाला, तर मानसिक धक्क्यातून सावरणे शक्य होईल.
गजानन भंडारे, रहिवासी, सीबीडी
पोलीस आयुक्तांना साकडे
सीबीडी सेक्टर ३ मधील बी टेन टाइप वसाहतीमधील रहिवासी परिमंडळ एकचे उपआयुक्त, गुन्हे शाखेचे उपआयुक्त व आयुक्त बीपिनकुमार सिंग यांनाही साकडे घालणार आहेत. पत्र पाठवून या परिसरातील घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास युद्धपातळीवर व्हावा व भविष्यात चोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन केले जाणार आहे.