मोठी बातमी! वकील गुणरत्न सदावर्ते यांना राहत्या घरातून पोलिसांनी घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 08:22 PM2022-04-08T20:22:27+5:302022-04-08T21:00:08+5:30
Advocate Gunaratna Sadavarte detained : राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई - एसटी कर्मचाऱ्यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'सिल्वर ओक' निवासस्थानावर चप्पल आणि दगडफेक केल्याच्या घटनेचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. यातच मंत्री हसन मुश्रीफ यांनी याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांची भाषणं तपासली पाहिजेत, अशी मागणी केली होती. त्यांनतर आता मुंबई पोलिसांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांना ताब्यात घेतले आहे. सदावर्ते हे एसटी कर्मचाऱ्यांचे वकील असून त्यांना त्यांच्या परळ येथील राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या आक्रमक आंदोलनाविरोधात १०७ आंदोलकांना गावदेवी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. साधारण ७.३० वाजताच्या सुमारास ४ ते ५ पोलीस सदावर्ते यांच्या घरी पोहोचले होते आणि ताब्यात घेतले. शरद पवार यांच्या घराबाहेर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सदावर्ते यांची चौकशी करणार आहेत.
आंदोलनानंतर सदावर्ते यांची प्रतिक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथील निवासस्थानाबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी अचानकपणे आंदोलन केले. या घटनेवर एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावर बोलताना सदावर्ते म्हणाले की, एकशे चोवीस महिलांचे कुंकू पुसले गेले. हल्लेखोर असते, तर ते व्यथित आणि चक्कर आलेले कसे असतील? बांगड्या फोडणं हे गुलामगिरीतून बाहेर येण्याचे लक्षण आहे असंही ते यावेळी म्हणाले.