Big news : येरवड्यात ४३ कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त ; लष्कराची गुप्तचर यंत्रणा आणि गुन्हे शाखेची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 07:27 PM2020-06-10T19:27:10+5:302020-06-11T11:22:31+5:30
लष्कराची गुप्तहेर यंत्रणा आणि गुन्हे शाखा यांना बनावट नोटांचा व्यापार होत असल्याची मिळाली होती माहिती..
पुणे : लष्कराची गुप्तचर यंत्रणा आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी येरवड्यातील एका ठिकाणी छापा मारुन तब्बल ४३ कोटी रुपयांपेक्षा अधिक बनावट नोटा जप्त केल्या आहेत. यात सहा जणांना अटक करण्यात आली आहे. यापैकी एक आरोपी लष्कराशी संबंधित आहे. उर्वरीत पाचजण हवाल्याचा धंदा करणारे आहे. रात्री उशिरापर्यंत पैसे मोजण्याचे काम सुरु होते. विमाननगर येथील संजय पार्क याठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस उपआयुक्त (गुन्हे शाखा) बच्चन सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कराची गुप्तहेर यंत्रणा आणि गुन्हे शाखा यांना विमाननगर या भागातील संजय पार्क याठिकाणी बनावट नोटांचा व्यापार होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. यात त्यांना मोठ्या संख्येने बनावट नोटा आढळुन आल्या. कारवाईतुन दोन हजार रुपयांच्या सर्वाधिक नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत. पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांचा देखील यात समावेश आहे. भारतीय चलनाबरोबरच बनावट विदेशी चलनाचा देखील यात समावेश आहे. मोठया प्रमाणात फेक डॉलर देखील या कारवाईतून जप्त करण्यात आले आहेत. बनावट नोटांचा व्यापार करणारे आरोपी यांचा व्यवसाय हवाल्याचा आहे. तर यातील एकजण लष्करातील सेवेत आहे. पकडण्यात आलेल्या सहा आरोपींपैकी दोन जण पुणे तर उर्वरीत चार जण मुंबईतील आहे. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरु होती.