मोठी बातमी! 'मेथ लॅब'चा भांडाफोड, 95 kg ड्रग्ज जप्त; तिहार तुरुंगाच्या वॉर्डनसह चौघे ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 03:37 PM2024-10-29T15:37:11+5:302024-10-29T15:37:56+5:30
दिल्ली एनसीआरमध्ये पोलिसांना मेथ लॅब आढळली. ही लॅब तिहार तुरुंगाचा वॉर्डन चालवत होता.
नवी दिल्ली: तुमच्यापैकी अनेकांनी लोकप्रिय वेब सीरिज 'ब्रेकिंग बॅड' पाहिली असेल. त्यात दोघेजण ड्रग्स बनवण्यासाठी मेथ लॅब तयार केल्याचे दाखवण्यात आले आहे. तशाच प्रकारची घटना दिल्ली-एनसीआरमध्ये उघडकीस आली आहे. पोलिसांनी येथून मेथॅम्फेटामाइन उत्पादन प्रयोगशाळेचा भांडाफोड केला आहे. विशेष म्हणजे, ही लॅब दिल्लीच्या तिहार तुरुंगातील वॉर्डनद्वारे चालवली जात होती.
Narcotics Control Bureau (NCB) operations unit in a joint operation with Special Cell, Delhi Police has busted a clandestine Methamphetamine manufacturing lab in Kasana Industrial Area of district Gautam Budh Nagar on 25th of October 2024 and found about 95 kg of Methamphetamine… pic.twitter.com/zWdhlHxNJ4
— ANI (@ANI) October 29, 2024
एनसीबीचे ऑपरेशन युनिट आणि दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मिळून या लॅबचा भंडाफोड केला. मिळालेल्या माहितीनुसार, 25 ऑक्टोबर 2024 रोजी गौतम बुद्ध नगरच्या कसना औद्योगिक परिसरात छापा टाकण्यात आला होता. यावेली सॉलिड आणि लिक्वीड, अशा दोन्ही प्रकारात सुमारे 95 किलो मेथॅम्फेटामाइन(ड्रग्स) जप्त करण्यात आले. याशिवाय ॲसिटोन, सोडियम हायड्रॉक्साईड, मिथिलीन क्लोराईड, प्रीमियम ग्रेड इथेनॉल, टोल्युइन, रेड फॉस्फरस, इथाइल ॲसिटेट आणि यंत्रसामग्रीही जप्त करण्यात आली आहे.
तिहार जेलचा वॉर्डन लॅब चालवायचा
धाडीच्या वेळी कारखान्यात उपस्थित असलेला दिल्लीस्थित व्यापारी आणि तिहार तुरुंगातील वॉर्डन यांनी बेकायदेशीर कारखाना उभारण्यात, रसायने खरेदी करण्यात आणि यंत्रसामग्री आयात करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. व्यापाऱ्याला यापूर्वी डीआरआयने एनडीपीएस प्रकरणात अटक केली होती आणि तिहार तुरुंगात ठेवण्यात आले होते. तो तिथेच वॉर्डनच्या संपर्कात आला आणि दोघांनी ही मेथ लॅब उभारण्याची योजना आखली.
औषध तयार करण्यासाठी मुंबईस्थित केमिस्टचा सहभाग होता, तर दिल्लीस्थित मेक्सिकन कार्टेल सदस्याने औषधाची गुणवत्ता तपासण्याचे काम केले. चारही आरोपींना एनसीबीने अटक करून 27 ऑक्टोबर रोजी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता, त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे, यावर्षी एनसीबीने गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशात पाच ठिकाणी अशा गुप्त लॅबचा पर्दाफाश केला आहे.