नागपुरात गुन्हे शाखेची मोठी कारवाई, २४ लाखांची एमडी पावडर जप्त!
By योगेश पांडे | Published: March 9, 2024 11:08 PM2024-03-09T23:08:54+5:302024-03-09T23:09:14+5:30
शहरात तीन आरोपींकडे मोठ्या प्रमाणावर एमडी पावडर असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या एनडीपीएस पथकाला मिळाली.
नागपूर : नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत २४ लाखांची एमडी पावडर जप्त केली आहे. या कारवाईमुळे शहरातील एमडी खरेदी विक्री किती मोठ्या प्रमाणात सुरू आहे याचेच प्रत्यंतर आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई झाली.
शहरात तीन आरोपींकडे मोठ्या प्रमाणावर एमडी पावडर असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या एनडीपीएस पथकाला मिळाली. पोलिसांनी आतिश लक्ष्मण बागडे (२८, अजनी रेल्वे कॉलनी, आरबी १/३२६), गौरव उर्फ सागर शेषराव कटारे (२५, टिमकी तीनखंबा चौक, तहसील) यांना सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळून २४१ ग्रॅम ५ मिली एमडी आढळली. त्या पावडरची किंमत २४.१५ लाख इतकी आहे.
पोलिसांनी या आरोपींकडून दोन मोबाईल फोन, मोटारसायकल, मोपेड, लोखंडी कुकरी असा २५.८६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणात एमडी पावडर कुठून आली याचा शोध सुरू आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ललिता तोडासे, मनोज घुरडे, शैलेष डोबोले, विजय यादव, विवेक अढाऊ, मनोज नेवारे, रोहीत काळे, सहदेव चिखले, शेषराव रेवतकर, सुभाष गजभिये, अनुप यादव, नितीन साळुंके, प्रवीण ठाकूर, सुखदेव धुर्वे, अमोल पडधाम यांच्या पथकाने ही कारवाई केली. अजनी पोलीस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.