गुटखा उद्योगावरील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई; तब्बल 15 ते 20 कोटींचा गुटखा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2021 12:00 AM2021-01-09T00:00:23+5:302021-01-09T00:00:49+5:30
सिल्व्हासा स्थित गोवा गुटखा कंपनीवर छापे
पुणे : शहरात गुटख्यावर बंदी असतानाही अवैधरित्या होणारी गुटख्याची विक्री थांबवण्यासाठी पुणेपोलिसांनी ‘गुटखा विरोधी मोहीमेअंतर्गत कारवाईचा धडाका सुरू केला आहे. गुजरात राज्यातील वापी आणि दादर नगर हवेलीतील सिल्व्हासा याठिकाणी छापे टाकून तब्बल 15 ते 20 कोटींचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. गुटखा बनविण्याचे साहित्यही पोलिसांनी जप्त केले आहे. यात गोवा गुटखा उत्पादन करणा-या फॅक्टरीचे मालक, चालक यांची नावे निष्पन्न झाली असून, दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. काशी व्हेंचर्स या कंपनीवर टाकलेला पुणे पोलिसांचा छापा व जप्ती ही भारतातील सदर अवैध गुटखा उद्योगावरील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात आले आहे.
पुणे पोलिसांनी मागील दोन महिन्यात 28 ठिकाणी छापे टाकून मोठया प्रमाणात अवैध गुटखा जप्त केला आहे. या गुन्हयातील आरोपींची चौकशी केली असता गुजरात राज्यात वापी आणि दादर नगरहवेलीतील सिल्व्हासा याठिकाणी गोवा या नावाने प्रतिबंधित गुटखा उत्पादन केले जात असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार पुणे पोलीसांचे युनिट चारचे पथकाने सिल्व्हासा येथे काशी व्हेंचर्स या कंपनीवर छापा टाकून 15 ते 20 कोटींचा गुटखा व गुटखा बनविण्याचा कच्चा माल जप्त केल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शुक्रवारी (दि. 8) दिली .
याप्रकरणात अद्याप दोन आरोपी ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्या चौकशीतून आणखी नावे निष्पन्न होण्याची शक्यता आहे , ज्यांचा याप्रकरणात सहभाग असेल तर त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल असे आयुक्तांनी सांगितले. यापूर्वी गुटखा कारवाईत अटक केलेल्या आरोपींकडे केलेल्या तपासात अवैध गुटख्याचे म्होरके हे वापी (गुजरात) व सिल्व्हासा (दादर नगरहवेली) येथे अवैधरित्या प्रतिबंधित गुटखा तयार करुन त्याचा मोठया प्रमाणावर पुरवठा चोरटया मार्गाने अटक आरोपींच्या मार्फत वितरण करतात हे निष्पन्न झाले.
सिल्व्हासा स्थित गोवा या नावाने प्रतिबंधीत गुटखा उत्पादन करुन पुरवठा करणा-या काशी व्हेंचर्स या कंपनीचा शोध घेण्यात आला. स्थानिक पोलीस, अन्न व औषध प्रशासन यांच्या मदतीने कंपनीवर छापा टाकून कोट्यवधींचा गोवा गुटखा व तो बनविण्यासाठी उपयोगात येणारा कच्चा माल त्यात सुंगधी द्रव्य, तंबाखु, सुपारी, चुना, कात पावडर, कॅल्शियम काबोर्नेट पावडर, मेन्थॉल क्रिस्टल, इलायची, ग्लिसरीन इ.पदार्थ व यंत्रसामुग्री जप्त करण्यात आली.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त रविंद्र शिसवे, अपर पोलिस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपआयुक्त बच्चनसिंह यांचे मार्गदर्शनाखाली युनिट चारचे पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील, पोलिस अंमलदार राजस शेख, सचिन ढवळे, कौस्तुभ जाधव, शितल शिंदे यांच्या पथकाने वापी आणि सिल्वासा याठिकाणी कारवाई केली.