बिहारच्या नवादामध्ये गावगुंडांचा हैदोस; अंदाधुंद गोळीबारानंतर 80 घरांना लावली आग
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 10:06 PM2024-09-18T22:06:40+5:302024-09-18T22:07:03+5:30
Nawada News: या घटनेनंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी तळ ठोकून आहे.
Bihar Crime :बिहारच्या नवादामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील महादलित टोला येथे बुधवारी(दि.18) गावगुंडांनी सुमारे 80 घरांना आग लावली. या घटनेनंतर मोठ्या संख्येने पोलीस घटनास्थळी तळ ठोकून आहेत. हे संपूर्ण प्रकरण मुफसिल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. या घटनेत अनेक गुरे जळून ठार झाली आहेत. तसेच, पीडित गावकऱ्यांनी गोळीबार आणि मारहाणीचा आरोपही केला आहे.
ही संपूर्ण घटना जिल्ह्यातील मुफसिल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देदौर कृष्णा नगरमध्ये घडली. नदीकाठावरील सरकारी जमिनीवर राहणाऱ्या लोकांच्या घरांना आग लावण्यात आली. या घटनेमुळे गावात संतापाची लाट पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तेथे पोहोचले आणि अथक प्रयत्नाने आग आटोक्यात आणली. सुदैवाने यात कोणत्याही व्यक्तीचा जीव गेला नाही.
या घटनेबाबत पीडित गावकऱ्यांनी आरोप केला की, बुधवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास शेकडो गावगुंड गावात पोहोचले आणि त्यांनी गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. गोळीबाराचा आवाज ऐकून लोक घाबरले. जीव वाचवण्यासाठी लोक इकडे तिकडे धावू लागले. अनेक गावकऱ्यांना मारहाण करण्यात आली आणि 80-85 घरांना आगही लावली.
वर्षभरापूर्वीही गोळीबार झाला होता
या आगीत अनेक गुरे जळून खाक झाल्याचे पीडित गावकऱ्यांनी सांगितले. घरातील साहित्यही पूर्णपणे जळून खाक झाले आहे. आता लोकांना खाण्यापिण्याची, निवाऱ्याची समस्या भेडसावत आहे. अचानक घडलेल्या प्रकारामुळे लोकांना काहीच समजले नाही. या घटनेत अनेक वाहनांचेही नुकसान झाले आहे. दरम्यान, गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात गोळीबाराची घटना घडली असून पोलिसांनी याकडे लक्ष दिले नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.