हद्दच झाली! इंजिनीयरनं विकलं रेल्वे इंजिन; अजब घोटाळा पाहून पोलीस चक्रावले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 11:04 AM2021-12-21T11:04:29+5:302021-12-21T11:04:58+5:30
रेल्वेच्या अभियंत्यानं बोगस कागदपत्रांच्या आधारे इंजिनच विकलं; गुन्हा दाखल
समस्तीपूर: बिहारमध्ये एक भलताच प्रकार घडला आहे. फसवणूक करणाऱ्या टोळीनं साऱ्या सीमा ओलांडल्या आहेत. समस्तीपूरमध्ये रेल्वेचं इंजिन विकण्यात आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये रेल्वेत काम करणाऱ्या एका अभियंत्यानं यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. बोगस कागदपत्रं तयार करून लोकोमोटिव्ह इंजिन विकल्याचा आरोप अभियंत्यावर आहे.
समस्तीपूर रेल्वे विभागात घडलेला प्रकार सध्या चर्चेचा विषय ठरतो आहे. समस्तीपूर लोको डिझेल शेडचे कर्मचारी राजीव रंजन झा यांनी पूर्णिया कोर्ट स्टेशन यार्डमध्ये असलेलं एक जुनं इंजिन विकलं आहे. मुख्य आरोपी झा रेल्वेत अभियंता पदावर कार्यरत आहेत. त्यांनी एका सुरक्षा रक्षकाच्या आणि अन्य अधिकाऱ्यांच्या मदतीनं इंजिन विकलं.
अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं अभियंत्यानं बोगस कागदपत्रं तयार करून इंजिन विकलं. १४ डिसेंबरला इंजिन अवैधपणे विकण्यात आलं. इंजिनाच्या विक्रीनंतर २ दिवसांनी हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. यानंतर १९ डिसेंबरला पूर्णिया कोर्ट पोलीस ठाण्याचे प्रभारी एम. एस. रहमान यांनी आरपीएफ चौकीत तक्रार नोंदवली. शेडमध्ये तैनात असलेला अभियंता आणि सुरक्षा रक्षकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.
चौकी प्रभारी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १४ डिसेंबरला आरोपी अभियंत्यानं गॅस कटरच्या मदतीनं इंजिन वेगळं केलं. सुशील नावाच्या एका हेल्परनं यासाठी त्याला मदत केली. काम थांबवण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना अभियंत्यानं बोगस कागदपत्रं दाखवली. इंजिनमधून भंगार काढायचं असल्याचं त्यानं अधिकाऱ्याला सांगितलं. दुसऱ्या दिवशी अधिकाऱ्यानं रजिस्टार तपासलं. त्यात इंजिनमधून निघालेल्या भंगाराबद्दल कोणतीच नोंद नव्हती. त्यानं याची माहिती इतर अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं.