रस्त्यात झालं पती-पत्नीचं भांडण तर बाइक थांबवून दोघांनी पुलावरून घेतली उडी, एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 06:20 PM2021-08-18T18:20:43+5:302021-08-18T18:22:55+5:30
दोघेही बाइकवरून चकसाहू रोडवरील कलकलियां पुलावरून जात होते. यावेळी जोडप्यात काही कारणावरून भांडण झालं आणि...
बिहारच्या समस्तीपूरमध्ये एका जोडप्याने छोट्याशा वादानंतर खोल पाण्यात उडली घेतली. या घटनेत तरूणाचा मृत्यू झाला तर तरूणीला बचाव दलाने वाचवलं. जीव वाचलेल्या तरूणीने मृत आपला पती असल्याचं सांगितलं. तर आत्महत्येचं कारण पती-पत्नीत सुरू असलेला वाद सांगण्यात येत आहे.
दोघेही बाइकवरून चकसाहू रोडवरील कलकलियां पुलावरून जात होते. यावेळी जोडप्यात काही कारणावरून भांडण झालं आणि बघता बघता दोघांनी पुलावरून खाली खोल पाण्यात उडी घेतली. जवळच असलेल्या मासेमारी करणाऱ्यांनी दोघांनाही पाण्यात उडी घेताना पाहिलं आणि त्यांना वाचवण्यासाठी धावून आले. मात्र, तरूणाचा मृत्यू झाला. तर तरूणीचा जीव वाचवण्यात त्यांना यश आलं. (हे पण वाचा : बोबड्या भाषेत ६ वर्षीय मुलीने उलगडलं आईच्या हत्येचं रहस्य, डोळ्यांनी पाहिली होती तिने सगळी घटना)
मृतक तरूण वैशाली जिल्ह्यातील हसनपूर जुनैद गावात राहणारा अविनाश कुमार पटेल आहे. तर तरूणी हरैल गावात राहणारी सोनाक्षी कुमारी आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, दोघांमध्ये काही कारणावरून वाद पेटला होता. यादरम्यान ते कुणासोबत तरी व्हिडीओ कॉलवर बोलत होते आणि शिव्याही देत होते. अशात अचानक दोघांनी पुलावरून खाली पाण्यात उडी घेतली. स्थानिकांनी घटनेची सूचना पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तरूणाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला.
दरम्यान, परिसरात चर्चा सुरू आहे की, मृत तरूणाचं आधी एका तरूणीसोबत लग्न झालं होतं आणि हरैल गावात राहणाऱ्या तरूणीसोबत त्याचं प्रेम प्रकरण सुरू होतं. यावरूनच त्यांच्यात वाद सुरू होता. पोलिसांनी घटनास्थळावरून बाइक ताब्यात घेतली. पोलिसांनी सांगितलं की, प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि चौकशीनंतर जे समोर येईल त्यानुसार कारवाई केली जाईल.