नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 15:07 IST2025-04-24T15:04:31+5:302025-04-24T15:07:11+5:30
लग्नाच्याच दिवशी नवरी तिच्या बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

फोटो - AI फोटो
बिहारच्या मुंगेर जिल्ह्यात लग्नाच्याच दिवशी नवरी तिच्या बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर मुलीच्या कुटुंबातील सदस्यांनी पोलीस स्टेशन गाठलं आहे. असरगंज पोलीस स्टेशन परिसरातील सजुआ पंचायतीच्या गावातील रहिवासी अरुण मंडल यांची मुलगी २१ वर्षीय नंदिनी उर्फ नेहा कुमारी हिचं लग्न होतं. लग्नामुळे आनंदाचं वातावरण होतं पण असं काहीतरी घडल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
लग्नाचे विधी सुरू असताना रसगुल्ला खाण्याच्या आणि हात धुण्याच्या बहाण्याने नेहा तिच्या बॉयफ्रेंडसोबत पळून गेली. नेहाला लग्नमंडपात बोलावलं जात होतं. पण तेव्हाच कुटुंबाला हे कळलं की नेहा तिच्या खोलीत नव्हती. ती बॉयफ्रेंडसोबत पळून गेली होती. नवरदेव आणि त्याच्या कुटुंबीयांना जेव्हा हे समजलं तेव्हा ते संतापले. रागाच्या भरात लग्नमंडपातून निघून गेले.
मजूर म्हणून काम करतात वडील
नेहाचे वडील अजय मंडल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्हाला चार मुली आणि दोन मुलं आहेत. आम्ही आमच्या संपूर्ण कुटुंबासह दिल्लीत राहतो आणि मजूर म्हणून काम करतो. आम्ही आमची मोठी मुलगी नेहा हिचं लग्न संग्रामपूर ब्लॉकमधील बैजनाथपूर गावातील कपिलदेव मंडल यांचा मुलगा अमरजीत कुमार याच्याशी ठरलं होतं. लग्नासाठी अडीच लाख रुपये हुंडा म्हणून देण्यात आला.
बॉयफ्रेंडसोबत पळून गेली
लग्नाची वरात आमच्या घरी आली आणि आम्ही त्यांचं स्वागत केलं. लग्नातील पाहुण्यांच्या जेवणाची नीट व्यवस्था करण्यात आली होती. पण हार घातल्यानंतर मुलगी तिच्या खोलीत गेली. काही वेळाने तिला लग्नमंडपात बोलावण्यात आलं. पण ती खोलीत नव्हती. आम्ही तिचा शोध घेतला तेव्हा आम्हाला कळलं की, ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत पळून गेली आहे.
नेहा घरातून पळून गेल्याची तक्रार
नेहाची बहीण गुडिया कुमारी आणि भाऊ अभिषेक यांनी सांगितलं की, आम्ही बहिणीच्या लग्नासाठी दिल्लीहून आलो होतो. लग्नात हार घातल्यानंतर ती म्हणाली, मला भूक लागली आहे, माझ्यासाठी दोन रसगुल्ला आणा. आम्ही तिच्यासाठी रसगुल्ला आणला. मग ती हात धुवायला गेली. पण काही वेळाने जेव्हा तिला कन्यादानासाठी बोलावायला गेलो तेव्हा ती तिच्या खोलीत नव्हती. कुटुंबाने नेहा घरातून पळून गेल्याची तक्रार असरगंज पोलीस ठाण्यात दिली आहे आणि पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.