Bihar News: बिहारच्या जेलमधील मद्यपीही दंड भरून सुटका करून घेऊ शकतील
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 07:43 AM2022-04-07T07:43:08+5:302022-04-07T07:43:59+5:30
bihar News: संपूर्ण दारूबंदी लागू असलेल्या बिहार राज्याच्या जेलमध्ये बंद असलेल्या मद्यपींनाही नवीन तरतुदीचा लाभ दिला जाणार आहे. या अंतर्गत दारू पिण्याच्या आरोपाखाली प्रथमच जेलमध्ये गेलेले आणि ३० दिवसांची शिक्षा पूर्ण केलेले आरोपी जेलमधून सुटू शकणार आहेत.
- एस. पी. सिन्हा
पाटणा : संपूर्ण दारूबंदी लागू असलेल्या बिहार राज्याच्या जेलमध्ये बंद असलेल्या मद्यपींनाही नवीन तरतुदीचा लाभ दिला जाणार आहे. या अंतर्गत दारू पिण्याच्या आरोपाखाली प्रथमच जेलमध्ये गेलेले आणि ३० दिवसांची शिक्षा पूर्ण केलेले आरोपी जेलमधून सुटू शकणार आहेत. ज्यांना ३० दिवस पूर्ण झालेले नाहीत, ते २ ते ५ हजार रुपयांचा दंड भरून जेलबाहेर येऊ शकणार आहेत. एवढेच नव्हे तर त्यांच्यावरील खटलाही बंद करण्याची तरतूद आहे.
जेलमधून सुटण्यासाठी आरोपीला कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर शपथपत्र सादर करावे लागेल. पोलिसांशी सहकार्य न केल्यास किंवा दंड न भरल्यास त्याला ३० दिवस जेलमध्ये रहावे लागेल. कोणी दुसऱ्यांदा दारू पिताना पकडला गेला तर त्याला एक वर्षाची शिक्षा अनिवार्य आहे.
दारूची सवय असणारांची ओळख छायाचित्र, आधार कार्ड व ब्रेथ अनलायझरच्या डिजिटल रेकॉर्डने पटविली जाणार आहे. राज्य सरकारच्या नव्या निर्णयामुळे राज्यातील न्यायालयांवरील खटल्यांचा भार कमी होईल व जेलमधील गर्दीही कमी होणार
आहे.
दारूबंदी कायद्याच्या उल्लंघनात यापूर्वी एखाद्या वाहनाची किंवा परिसराची सीलबंदी झालेली असेल तर नव्या तरतुदीनुसार, ते सोडविण्याची संधी मिळणार आहे. तसेच खटला बंद करण्यात येणार आहे.
त्यांचा खटला बंद केला जाईल
दारूबंदी खात्याचे अपर मुख्य सचिव के. के. पाठक यांनी सांगितले की, दारू पिण्याच्या आरोपाखाली जेलमध्ये बंद असलेले आरोपीही नव्या नियमावलीनुसार दंड भरून सुटू शकणार आहेत. त्यांचा खटला बंद केला जाईल.
नव्या नियानुसार, दारूसह पकडलेल्या वाहनांच्याना विमा कंपनीने
निर्धारित केलेल्या वाहन मूल्याच्या ५० टक्के रक्कम दंड भरून वाहन सोडले जाईल. वाहनाचा दावेदार नसल्यास वाहन जप्तीनंतर १५ दिवस वाट पाहून लिलाव करण्यात येणार आहे.