आलिशान घरांमध्ये चोऱ्या करून बनला कोट्याधीश, पत्नीला निवडणुकीत उभं केलं आणि मग....
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 12:54 PM2021-10-26T12:54:06+5:302021-10-26T12:54:41+5:30
गाझियाबादमध्ये पोलिसांच्या हाती लागलेला चोरा इरफान उर्फ उजाले याला सुरूवातीपासून हाय प्रोफाइल लाइफ जगण्याची इच्छा होती.
'धूम २' सिनेमा तर तुम्ही पाहिला असेल. ज्यात एक हुशार चोर कशाप्रकारे चोऱ्या करतो आणि त्यातून मिळालेल्या पैशांनी मजा करत होता. हृतिक रोशनची रील लाइफ स्टोरी बिहारमधील सीतामढीच्या इरफानची रिअल लाइफ स्टोरी आहे. त्याने इतक्या शिताफिने चोऱ्या केल्या की, पोलिसही हैराण झाले.
गाझियाबादमध्ये पोलिसांच्या हाती लागलेला चोरा इरफान उर्फ उजाले याला सुरूवातीपासून हाय प्रोफाइल लाइफ जगण्याची इच्छा होती. ज्याबाबत तो नेहमीच स्वप्नांच्या दुनियेत राहत होता. हीच स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्याने त्याचं घर सोडलं आणि परदेशात पैसे कमवायला गेला. काही वर्षांनी तो परत आला तर त्याची लाइफस्टाईल बदलली होती. मजा-मस्ती करणं त्याला आवडत होतं. महागड्या गाड्या चालवणे आणि मित्रांना पार्ट्या देणे त्याचं रोजचं काम होतं.
इरफानचे आई-वडील मजूर होते. त्याचं हे बदलेलं रूप पाहून लोकंही हैराण झाले होते की, अखेर त्याच्याकडे इतका पैसा कुठून आला. इरफान गावातील लोकांवर पैसे लुटवत होता. त्यामुळे गावातील अनेक तरूण त्याच्या मागे-पुढे फिरत होते. आजूबाजूच्या भागात कुठे ऑर्केस्ट्रा असायचा तेव्हा इरफान बारबालांवर लाखो रूपये उडवत होता. दिवसेंदिवस इरफानची महत्वाकांक्षा वाढत होती आणि अशातच त्याने पत्नीला निवडणुकीत उभं केलं
आपली पत्नी गुलशन प्रवीणला जिल्हा परिषद निवडणुकीत त्याने उभं केलं आणि प्रचारात लाखो रूपये खर्च केले. त्याची इच्छा होती की, निवडणूक लढवून पत्नीला जिल्हा परिषद अध्यक्ष बनवावं. पत्नी जिंकून यावी म्हणून तिला लोकांनी मतदान करावं म्हणून लोकांना आर्थिक मदतही करत होता. चोरीच्या पैशातून त्याने गावात अनेक रस्ते बांधले. इतकंच नाही तर गावात कुणी गरीब वारलं किंवा कुणाचं लग्न असेल तेव्हा इरफान मदत करायचा.
काय करत होता इरफान?
इरफानने गाव सोडलं तेव्हा त्याला पैसे कमावण्याची तलब होती. पण त्याने सरळ रस्ता निवडण्याऐवजी चुकीचा रस्ता निवडला. आलिशान बिल्डींग्सवर त्याची नजर राहत होती. तो धूम २ सिनेमा स्टाइलने चोरी करत होता आणि घरातील दागिन्यांसहीत इतर मूल्यवान वस्तू चोरी करत होता. आधी तो काहीतरी कारण सांगत घरात शिरत होता आणि मग चोरी करत होता. त्याने देशातील महानगरांमधील तीस पेक्षा आलिशान घरांमध्ये चोरी केली.
यूपी पोलिसांनी केली पोलखोल
अखेर तो उत्तर प्रदेश पोलिसांच्या हाती लागला आणि काही दिवसांपूर्वी जेव्हा पोलिसाने त्याच्या घरी छापा मारला तेव्हा गावातील लोकांसमोर त्याचं सत्य आलं. पोलिसांनी त्याला अटक करून सोबत घेऊन गेले. गावात त्याच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की, गावातील कुणीही त्याच्या विरोधात बोलण्यास तयार नव्हते.