Corona Vaccine: तब्बल ११ वेळा कोरोना लस घेणाऱ्या आजोबांविरोधात FIR; बिहार पोलिसांकडून अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2022 02:00 PM2022-01-09T14:00:38+5:302022-01-09T14:01:35+5:30
Corona Vaccine: मधेपुरा येथील एका ८४ वर्षीय आजोबांनी आपण एक दोन नाही तर तब्बल ११ वेळा कोरोनाची लस घेतल्याचा दावा केला आहे.
पाटणा: कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यात आता ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे जगाची चिंता वाढली आहे. कोरोना नियंत्रणासाठी लसीकरण हाच सर्वोत्तम उपाय असून, कोरोना लसीबाबत (Corona Vaccine) वेगवेगळे दावे आणि माहिती समोर येत आहे. मात्र, बिहारमधील मधेपुरा येथून समोर आलेली माहिती काहीशी वेगळी आहे. मधेपुरा येथील एका ८४ वर्षीय आजोबांनी आपण एक दोन नाही तर तब्बल ११ वेळा कोरोनाची लस घेतल्याचा दावा केला आहे. याच आजोबांविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला असून, बिहार पोलिसांकडून या आजोबांना अटक करण्यात येणार आहे.
बिहारमधील मधेपुरा जिल्ह्यात राहणाऱ्या ८४ वर्षीय ब्रह्मदेव मंडल या व्यक्तीने काही दिवसांपूर्वी आपण कोरोनाची लस ११ वेळा घेतल्याचा दावा केला होता. यानंतर बिहार प्रशासनात मोठी खळबळ उडाली होती. यानंतर आता या आजोबांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. ब्रह्मदेव मंडल यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १८८, ४१९, ४२० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, काही अजामीनपात्र कलमे लावण्यात आलेली आहे. मात्र, वयाच्या आधारावर ब्रह्मदेव मंडल यांना जामीन मिळू शकतो, असे सांगितले जात आहे.
नेमके प्रकरण काय?
ब्रह्मदेव मंडल यांनी दावा केला आहे की, त्यांनी आतापर्यंत कोरोनाच्या लसीचे ११ डोस घेतले आहेत. एवढेच नाही तर या डोसमुळे मला खूप फायदा झाला आहे. त्यामुळे मी वारंवार डोस घेतो. काही दिवसांपू्र्वी ते लस घेण्यासाठी चौसा पीएचसी येथे गेले होते. मात्र तिथे लसीकरणाचे काम बंद झाल्याने ते लसीचा बारावा डोस घेऊ शकले नाहीत. ब्रह्मदेव मंडल यांचे वय आधार कार्डवरील नोंदीनुसार ८४ वर्षे आहे. ते टपाल विभागात काम करायचे सध्या सेवानिवृत्तीनंतर गावातच वास्तव्यास आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी लसीचा पहिला डोस १३ फेब्रुवारी रोजी पुरौनी पीएससीमध्ये घेतला होता. त्यानंतर १३ फेब्रुवारीपासून ३० डिसेंबर २०२१ पर्यंत त्यांनी लसीचे ११ डोस घेतले होते. त्यांनी घेतलेल्या लसींची संपूर्ण माहिती, वेळ आणि ठिकाण कागदावर नोंदवून ठेवले आहेत.
लस अमृतासारखी आहे
ब्रह्मदेव मंडल यांनी सांगितले की, लस अमृतासारखी आहे. सरकारने ही खूप चांगली गोष्ट तयार केली आहे. मात्र काही लोक सरकारला बदनाम करण्याच्या प्रयत्नात आहेत. मी सर्वांना लस घेण्याचे आवाहन करतो. दरम्यान, ब्रह्मदेव यांनी केलेल्या दाव्यामुळे बिहारमधील लसीकरण मोहिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.