कोविड सेंटरमध्ये लटकलेल्या अवस्थेत सापडला लॅब टेक्निशियनचा मृतदेह! हत्या की आत्महत्या?, चौकशीला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 01:26 PM2022-02-17T13:26:56+5:302022-02-17T13:27:32+5:30
बिहारच्या सीतामढी येथील डुमरा ठाणे हद्दीतील शांतिनगर मोहल्ला स्थित कोविड सेंटरमध्ये एका युवकाचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर कोविड सेंटरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
सीतामढी-
बिहारच्या सीतामढी येथील डुमरा ठाणे हद्दीतील शांतिनगर मोहल्ला स्थित कोविड सेंटरमध्ये एका युवकाचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर कोविड सेंटरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. कोरोना सेंटरच्या टेरेसवर पाण्याच्या टाकीच्या पाइपला लटकलेल्या अवस्थेत एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळून आलेला आहे. पोलिसांनी संबंधित प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात केलेली आहे. आरोग्य कर्मचारी संघटनेच्या नेत्यानं ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला आहे.
जिल्हा आरोग्य कर्मचारी संघाचे नेते रमाशंकर सिंह यांनी संबंधित कर्मचाऱ्यांचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला असल्याचं म्हटलं आहे. कोविड सेंटरमधील पाईप खूप खाली आहे आणि त्याला गळफास घेण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे याची सखोल चौकशी केली गेली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
घटनास्थळावर पोहोचलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनीही या मृत्यूला संशयास्पद असल्याचं म्हटलं आहे. पण चौकशीअंतीच पुढील कारवाई करण्यात येईल असंही नमूद केलं आहे. मृत व्यक्तीचं नाव प्रवीण गिरी असल्याचं समोर आलं आहे. प्रवीण गिरी सीतामढी रुग्णालयात लॅब टेक्निशियन पदावर कार्यरत होता. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून त्याचा अहवाल आल्यानंतर अधिक खुलासा होऊ शकेल असं पोलिसांनी म्हटलं आहे.