बिहारी चोरटे, तामिळनाडूत चोरी, राजधानी एक्सप्रेस अन् ... चार ट्रॉली बॅग भरून आढळले मोबाईल!
By नरेश डोंगरे | Published: December 9, 2023 03:10 PM2023-12-09T15:10:51+5:302023-12-09T16:20:59+5:30
नागपूरहून पुढे निघाल्यानंतर अचानक कोच नंबर बी-९ मध्ये रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) एक पथक शिरले. त्या डब्यात बसलेल्यांपैकी दोन संशयीतांची त्यांनी चाैकशी सुरू केली.
नागपूर : वेगाशी स्पर्धा करीत राजधानी एक्सप्रेस तामिळनाडूतून दिल्लीकडे निघाली. नागपूरहून पुढे निघाल्यानंतर अचानक कोच नंबर बी-९ मध्ये रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) एक पथक शिरले. त्या डब्यात बसलेल्यांपैकी दोन संशयीतांची त्यांनी चाैकशी सुरू केली. 'हे, तेच' असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पुढच्या स्थानकावर त्या दोघांना घेऊन पोलीस उतरले. डब्यातील इतर प्रवाशांना काय प्रकार आहे, ते कळायला मार्ग नव्हता. त्यामुळे ते आपसात कुजबूज करू लागले. नंतर मात्र हळूच एकाने त्यांना प्रकार काय आहे ते सांगितले अन् अतिशय साळसुदपणे आपल्यासोबत बसून असलेले ते दोन मुले अट्टल चोरटे असल्याचे प्रवाशांना कळाल्यानंतर अनेकांनी डोक्यावर हात मारून घेतला.
रावल कुमार आणि कृष्णकुमार (दोघांचीही नावे बदललेली) हे अनुक्रमे १७ आणि १६ वर्षांची दोन मुले. जेमतेम मिसुरडं फुटलेले हे दोघे बिहारमधील सराय साहो येथील रहिवासी. काही दिवसांपूर्वी ते तामिळनाडूत गेले होते. कांचीपूरम जिल्ह्यातील ओरागडम पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे एक मोबाईलचे शोरूम त्यांनी शुक्रवारी पहाटे फोडले आणि तेथून ८ लाख रुपये किंमतीचे ८२ मोबाईल चोरून ते राजधानी एक्सप्रेसमध्ये बसले. तिकडे कांचीपूरम पोलिसांनी चोरीची तक्रार मिळताच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा माग काढणे सुरू केले. ते राजधानी एक्सप्रेसमध्ये बसून नागपूरकडे निघाल्याचे कळताच कांचीपूरम पोलिसांनी नागपूर आरपीएफला माहिती दिली.
त्यानुसार, राजधानी एक्सप्रेस नागपूरात येताच आरपीएफच्या पथकाने गाडीची चौकशी सुरू केली. मात्र, वेळेअभावी गाडीची तपासणी अर्धवट राहिल्याने आणि राजधानी एक्सप्रेस मार्गस्थ झाल्याने आरपीएफच्या पथकाने धावत्या ट्रेनमध्ये तपासणी सुरू ठेवली आणि अखेर बी-९ कोचमध्ये काटोल स्थानकाजवळ आरोपी आरपीएफच्या हाती लागले. त्यांच्या जवळ असलेल्या चार मोठ्या सुटकेस (ट्रॉली बॅग)मध्ये मोबाईल भरून होते. ते ताब्यात घेऊन आरोपींना आमला स्थानकावर उतरवण्यात आले.
धावत्या ट्रेनमध्ये चोरटे सिनेस्टाईल जेरबंद!https://t.co/CbvSFUBywhpic.twitter.com/6OQbn0s6Ts
— Lokmat (@lokmat) December 9, 2023
त्यांचे मनसुबे उधळले
दिल्ली मार्गे आपल्या प्रांतात जाऊन मोबाईल विकण्याचे आणि त्यातून आलेल्या पैशातून मजा मारण्याचे या भामट्यांचे मनसुबे होते. कांचीपूरम पासून नागपूरपयर्यंत अर्थात सुमारे १२०० किलोमिटर दूर आल्यानंतर ते फारच आश्वस्त होते. मात्र, नागपूर रेल्वे सुरक्षा दलाने त्यांना जेरबंद केल्याने त्यांचे मनसुबे उधळले गेले.