अमळनेरसह मध्यप्रदेशातून दुचाकी लांबविणारा चोरटा जेरबंद
By सागर दुबे | Updated: March 19, 2023 20:57 IST2023-03-19T20:56:57+5:302023-03-19T20:57:07+5:30
कारवाई दरम्यान १४ दुचाकी हस्तगत

अमळनेरसह मध्यप्रदेशातून दुचाकी लांबविणारा चोरटा जेरबंद
सागर दुबे, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : जिल्ह्यातील अमळनेर शहरासह मध्यप्रदेश राज्यातून दुचाकी चोरणा-या अट्टल चोरट्याला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. त्याच्याकडून वेगवेगळ्या कंपनीच्या १४ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या असून त्याला पुढील कार्यवाहीसाठी अमळनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अजय अंबालाल पावरा (२७, रा. वकवड-बोराडी, ता. शिरपूर, जि.धुळे) असे अटक केलेल्या अट्टल चोरट्याचे नाव आहे.
गेल्या काही महिन्यांपासून चोपडा, अमळनेर परिसरामध्ये दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. त्यामुळे पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे स्वतंत्र पथक चोरट्यांच्या शोधार्थ तयार केले होते. या पथकाकडून चोपडा, अमळनेर परिसरामध्ये पेट्रोलिंग सुरू होती. अखेर शनिवारी अमळनेरमध्ये एक तरूण विना क्रमांकाची दुचाकी घेवून फिरत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यांनी अमळनेर शहर गाठून तरूणाचा शोध घेवून त्याला पकडले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने अजय अंबालाल पावरा असे त्याचे नाव सांगितले. खाक्या दाखविताच त्याने अमळनेर शहरासह मध्यप्रदेश राज्यातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याशिवाय पोलिसांना १४ दुचाकी सुध्दा त्याने काढून दिल्या. पुढील कार्यवाहीसाठी त्याला अमळनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
यांनी केली कारवाई- ही कारवाई पोलिस वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रवी नरवाडे, राजेश मेढे, संजय हिवरकर, गोरख बागुल, कमलाकर बागुल, संदीप पाटील, संदीप साळवे, प्रवीण मांडोळे, ईश्वर पाटील, लोकेश माळी, अशोक पाटील यांच्या पथकाने केली आहे.