बिल्किस बानो प्रकरण: ‘ते’ ११ दोषी संपर्कात नाही; निर्णयाची प्रतही अद्याप अप्राप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 05:58 AM2024-01-11T05:58:24+5:302024-01-11T05:58:56+5:30
पोलिस अधीक्षक बलराम मीणा यांनी दिली माहिती
दाहोद (गुजरात) : बिल्किस बानो प्रकरणातील ११ आरोपी पोलिसांच्या संपर्कात नाहीत, तसेच आमच्याकडे गुन्हेगारांच्या आत्मसमर्पणाची माहिती नाही. दोषींना २ आठवड्यांत आत्मसमर्पण करण्यास सांगण्यात सांगितल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रत अद्याप आम्हाला मिळाली नाही, असे पोलिस अधीक्षक बलराम मीणा यांनी सांगितले.
सर्व गुन्हेगार सिंगवाडचे रहिवासी आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर रणधिकपूरमध्ये पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.
सन २००२ च्या बिल्किस बानो सामूहिक बलात्काराच्या ११ दोषींची मुदतपूर्व सुटका करण्याचा राज्य सरकारचा निर्णय न्यायालयाने ८ जानेवारी रोजी रद्द केला होता. ‘गुजरात सरकार दोषींना कसे माफ करू शकते? महाराष्ट्रात सुनावणी झाली तर सुटकेचा निर्णयही तिथले सरकार घेईल, असे न्यायालयाने म्हटले.
- न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्जल भुईया यांच्या खंडपीठाने निर्णय देताना सांगितले, ‘शिक्षा गुन्हेगारी थांबवण्यासाठी दिली जाते. पीडितेच्या दु:खाचीही काळजी घ्यावी लागेल. गुजरात सरकारला सुटकेचा निर्णय घेण्याचा अधिकार नाही. त्याने आपल्या सत्तेचा आणि अधिकाराचा दुरुपयोग केला आहे.’
- या टिप्पणीसह, सर्वोच्च न्यायालयाने मे २०२२ मध्ये न्यायमूर्ती अजय रस्तोगी (निवृत्त) यांचा निर्णयदेखील रद्द केला, ज्यामध्ये ११ दोषींना लवकर माफीसाठी गुजरात सरकारकडे अपिलाची परवानगी दिली होती.