एकतर्फी प्रेमानं वेडं केले, महिलेचं अपहरण करुन बेदम मारलं; चाकूने हातावर ६ आकडा लिहिला, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 09:52 AM2022-01-04T09:52:19+5:302022-01-04T09:52:53+5:30
पोलिसांनी सध्या आरोपी मार्टिनेजला अपहरण आणि हल्ल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.
वॉश्गिंटन – प्रेम म्हणजे आपुलकीचं आणि जिव्हाळ्याचं नातं, प्रेमासाठी काहीही करायला तयार असणारे जोडपे तुम्ही पाहिले असतील. परंतु या प्रेमाच्या नात्याला काळीमा फासण्याचं काम अमेरिकेत घडलं आहे. अमेरिकेत एका अब्जाधीश व्यक्तीला प्रेमाने इतकं आंधळं केले की, त्याने एकतर्फी प्रेमातून महिलेचे अपहरण केले. बळजबरीनं प्रेम मिळवण्यासाठी महिलेचं अपहरण करुन तिला आठवडाभर टॉर्चर करण्यात आले. मात्र महिलेच्या प्रसंगावधनाने थोडक्यात तिचा जीव वाचला आणि तिने थेट पोलीस ठाणे गाठत आरोपीला बेड्या ठोकायला भाग पाडलं.
६ महिन्याची दिली मुदत
न्यूयॉर्क पोस्टमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, यूएसच्या उटाह येथे राहणाऱ्या अब्जाधीशाने एका महिलेचे अपहरण केवळ तिच्यावर प्रेम करतो म्हणून केले होते. परंतु ही महिला आरोपीला पसंत करत नव्हती. आरोपीने महिलेचे अपहरण करुन तिला बेदम मारहाण करत तिच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. ३९ वर्षीय आरोपी रमोन मार्सियो मार्टिनेजने महिलेच्या हातावर एका टोकदार वस्तूने ६ आकडा लिहिला. याचा अर्थ तिला ६ महिन्याची मुदत दिली होती. या काळात तिला दोन्ही पैकी एक गोष्ट स्वीकारण्याची धमकी दिली होती. त्यात प्रेम आणि मृत्यू असं आरोपीने म्हटलं होतं.
पोलिसांनी सध्या आरोपी मार्टिनेजला अपहरण आणि हल्ल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, जेव्हा आरोपीने तिचे अपहरण केले तेव्हा प्रसंगावधान राखत तिने तिच्या मित्राला मेसेज करत अपहरण झाल्याची माहिती दिली. त्यानंतर पीडितेच्या मित्रांनी पोलीस ठाणे गाठत पोलिसांकडे मदत मागितली. तेव्हा पोलिसांनी तात्काळ पीडित महिलेचा शोध घेत तिला कैदेतून बाहेर काढलं.
पोलीस म्हणाले की, महिलेने तिच्या मित्राला मेसेज करुन जीव धोक्यात असल्याचं कळवलं. माझं अपहरण झालं आहे. प्लीज मला मदत कर असं ती म्हणाली होती. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ या घटनेची दखल घेत मार्टिनेजचा शोध घेतला. आरोपीने जेव्हा घराचा दरवाजा उघडला तेव्हा त्याच्या हातात बंदूक होती. अधिकाऱ्यांनी सावधानतेने त्याला अटक केली. आरोपीच्या घरीच पीडित महिलेला बंद ठेवले होते. महिलेची परिस्थिती अत्यंत नाजूक होती. तिला वाईटरित्या मारहाण करण्यात आली होती. महिलेला श्वासही घेण्यास त्रास होत होता.
आरोपीने पीडित महिलेवर केले चाकूने वार
आरोपी मार्टिनेज पीडित महिलेवर चाकूने वार करत होता. कमरेतील पट्ट्यानेही तिला मारहाण करण्यात आली. कधी कधी तिच्यावर बंदूक रोखत होता. महिलेच्या चेहऱ्यावर आरोपीने हल्ला केला ज्यामुळे तिच्या चेहऱ्यावर मारहाणीचे निशाण बनले. आरोपीने महिलेला ६ महिन्याची मुदत देत प्रेमाची ऑफर स्वीकार नाहीतर तुला मारून टाकेन अशी धमकी दिली होती.