कामगार अधिकाऱ्याच्या घरात कोट्यवधींचे घबाड; नोटा मोजण्यासाठी मागवावं लागलं मशीन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2021 09:13 AM2021-12-12T09:13:29+5:302021-12-12T09:14:40+5:30
पाटणा, हाजीपूर आणि मोतीहारी येथे दक्षता विभागाची कारवाई
पाटणा : दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी हाजीपूरचे जिल्हा कामगार अधिकारी दीपक कुमार शर्मा यांच्या घरी केलेल्या छापासत्रात कोट्यवधींची रोकड आणि मोल्यवान दागिने जप्त केले आहेत. या अधिकाऱ्याने अवैध मार्गाने कोट्यवधींची संपत्ती जमविली असल्याची माहिती दक्षता विभागाला मिळाली होती. त्यानुसार पाटणा, हाजीपूर आणि मोतीहारी या तिन्ही ठिकाणी एकाच वेळी ही कारवाई करण्यात आली आहे.
पाटणातील दीघा परिसरात असलेल्या महावीर कॉलनीतील दीपक कुमार यांच्या घरातून नोटांनी भरलेल्या बॅगा आणि पोती जप्त करण्यात आली आहेत. त्याच्या घरांतून जप्त केलेली रोकड दोन कोटींहून अधिक असेल, असा अंदाज आहे.
कारवाई करीत असताना समोर येत असलेली संपत्ती पाहून सर्व अधिकारीही चक्रावून गेले. अधिकाऱ्यांना घरात सोने-चांदीचे दागिने, सोन्याची बिस्कीटे, मौल्यवान हिरे, डझनभर क्रेडिट कार्ड आणि जमिनीची कागदपत्रे आढळून आली आहेत. यामुळे एकूण संपत्तीचा आकडा अधिक असणार आहे.
नोटा मोजण्यासाठी मागवली मशीन
कारवाईदरम्यान लक्षात असे आले की, सापडेल्या नोटांचे प्रमाण खूप आहे. तिथे असलेल्या अधिकाऱ्यांनी नोटांची मोजदाद कऱणे शक्य नव्हते. त्यामुळे अखेर नोटा मोजण्याची मशिन मागवावी लागली.