बिश्नोई गँगने स्वीकारली बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी? फेसबुक पोस्ट व्हायरल; आरोपी म्हणाला- 'मै १७ साल का...'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 06:35 AM2024-10-14T06:35:16+5:302024-10-14T06:36:39+5:30

या पोस्टची तथ्यता पडताळण्यात येत असल्याचे गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी सांगितले...

Bishnoi Gang accepts responsibility for Baba Siddiqui's murder? Facebook post goes viral | बिश्नोई गँगने स्वीकारली बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी? फेसबुक पोस्ट व्हायरल; आरोपी म्हणाला- 'मै १७ साल का...'

बिश्नोई गँगने स्वीकारली बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी? फेसबुक पोस्ट व्हायरल; आरोपी म्हणाला- 'मै १७ साल का...'

मुंबई : माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची शनिवारी गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याच्या घटनेचा मुंबई पोलीस चहुबाजूंनी तपास करत आहेत. हत्येची जबाबदारी स्वीकारणारी बिश्नोई गँगची एक फेसबुक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. या पोस्टची तथ्यता पडताळण्यात येत असल्याचे गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी सांगितले.

चार आरोपींची ओळख पटविण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. त्यातील गुरमेल सिंगसह दोघांना अटक केली आहे. शिवकुमार गौतम (२४) व त्याचा साथीदार मोहम्मद झिशान अख्तर याच्या शोधासाठी १५ पथके मुंबईबाहेर रवाना झाली आहेत. अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटभोवती सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून सलमानने पुढील काही दिवसांसाठी सर्व कार्यक्रम रद्द केल्याचे समजते. रात्री सिद्दीकी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

फेसबुक पोस्टमध्ये नेमके काय?
‘सलमान खान आम्हाला ही लढाई नको होती. पण तू आमच्या भावाला नुकसान पोहोचवलेस. आज ज्या बाबा सिद्दीकीचे कौतुक होत आहे, तो एकेकाळी सलमान खानसह मकोका गुन्ह्यात सहभागी होता. अनुज थापन आणि दाऊद इब्राहिमला बॉलिवूड, राजकारण, प्रॉपर्टी डीलिंगशी जोडल्यामुळे त्याची हत्या झाली. जो सलमान व दाऊदला मदत करेल, त्याचा हिशेब केला जाईल.’ 

लोणकरच्या भावाला अटक
मुंबई : फेसबुक पोस्ट करत बिष्णोई गँगचा सदस्य म्हणून हत्येची जबाबदारी स्वीकारणाऱ्या शुभम लोणकरचा भाऊ प्रवीणला (२८) गुन्हे शाखेने रविवारी रात्री पुण्यातून अटक केली आहे. प्रवीणही या कटात सहभागी असल्याचे समोर येताच त्याच्यावर अटकेची कारवाई केली. प्रवीणचा कटात सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे. 

आरोपी म्हणाला, मै १७ साल का... दुसऱ्याला २१ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी -
हत्येप्रकरणी अटक केलेल्या गुरमैल बलजित सिंग (२३) आणि अन्य एका आरोपीला रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी एका आरोपीने ‘मै १७ साल का हुँ’ असे  सांगितल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. पोलिसांनी जप्त केलेल्या आधारकार्डनुसार त्याचे वय २१ होते. वयाच्या मुद्द्यावरून एक ते दीड तास गोंधळ उडाल्यानंतर न्यायालयाने आरोपीची वैद्यकीय चाचणी करून कोठडीसाठी पुन्हा न्यायालयात सादर करण्यास सांगितले. गुरमैल याला २१ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

 गुन्हे शाखेने सादर केलेल्या माहितीनुसार, आरोपीचे वय १९ होते. सरकारी वकील गौतम गायकवाड यांनी दिलेल्या माहितीत, आधारकार्डनुसार त्याचा जन्म २००३चा असल्याने त्याचे वय २१ असल्याचे सांगितले. न्यायाधीशांनी आधारकार्ड मागवून घेतले. आरोपीला आधारकार्डबाबत विचारताच त्याने ते बनावट असल्याचे सांगितल्याने गोंधळात भर पडली. काही वेळाने आरोपीने आधारकार्डवरील नावही खोटे असल्याचे न्यायालयात सांगितले. जवळपास एक ते दीड तास वयावरच युक्तिवाद सुरू होता. 

आदेश काय, पोलिसही बुचकळ्यात?
न्यायालयाचा आदेश समजून घेईपर्यंत पोलिसांचाही गोंधळ उडालेला दिसला. सुरुवातीला दोघांना कोठडी झाल्याचे समजून पोलिस उपायुक्त विशाल ठाकूर बाहेर पडणार तोच फक्त एकाला कोठडी झाल्याचे समजताच ते मागे फिरले. न्यायालयाचे आदेश समजून घेईपर्यंत न्यायाधीश निघून गेले होते. पोलिस बराच वेळ ऑर्डर समजून घेत होते. वैद्यकीय अहवाल येईलपर्यंत एक आरोपी गुन्हे शाखेच्या ताब्यात राहणार आहे.
 

Web Title: Bishnoi Gang accepts responsibility for Baba Siddiqui's murder? Facebook post goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.