धावत्या रेल्वेतून मुद्देमाल पळविणारा भाजपाचा पदाधिकारी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 02:58 PM2019-01-12T14:58:06+5:302019-01-12T14:58:20+5:30
आरोपी प्रदीपकुमार तिवारी हा भाजपाचा पदाधिकारी असल्याचे लोहमार्ग पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे.
वर्धा : धावत्या रेल्वेमध्ये टिसीसोबत वाद करून सोनसाखळीसह महागडा मोबाईल पळवून नेण्यात आला. वर्धा लोहमार्ग पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल होताच आपल्या हालचालिंना वेग देत सदर घटनेतील आरोपी प्रदीपकुमार सत्यनारायण तिवारी रा. लेदगाई जि. लातेहार झारखंड याला त्याच्या मुळ गावावरून ताब्यात घेतले. त्याच्याकडून वर्धा लोहमार्ग पोलिसांनी चोरीचा मोबाईल जप्त केला आहे. आरोपी प्रदीपकुमार तिवारी हा भाजपाचा पदाधिकारी असल्याचे लोहमार्ग पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, नागपूर मध्ये रेल्वेमध्ये टिसी जितेंद्र दर्भे हे सिकंदराबाद-बरोणी स्पेशल एक्स्प्रेसमध्ये कर्तव्यावर होते. तर हैद्राबाद येथील आयोजित कार्यक्रम आटोपून प्रदीपकुमार तिवारी हेही याच रेल्वेने प्रवास करीत होते. जितेंद्र यांच्याशी भुगाव रेल्वे स्थानक दरम्यान धावत्या रेल्वेत जागा आरक्षणाच्या कारणावरून प्रदीपकुमार तिवारी व त्यांच्या सहकार्यांनी वाद केला. तिवारी हे इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी टिसी दर्भे यांच्या जवळील सोनसाखळी व महागडा मोबाईल हिसकावून यशस्वी पळ काढला. या घटनेची तक्रार प्राप्त होताच गुन्ह्याची नोंद घेवून वर्धा लोहमार्ग पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान वर्धा लोहमार्ग पोलिसांनी नागपूर रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्हीचे चित्रकरण तपासले. तसेच मोबाईलचे लोकेशन ट्रेस करून आरोपीचा मागोवा घेतला.
दरम्यान, खात्रीदायक माहिती मिळताच वर्धा लोहमार्ग पोलीस स्टेशनच्या चमुने वर्धा लोहमार्ग पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन वडते यांच्या मार्गदर्शनात झारखंड राज्यातील लेदगाई गाठून प्रदीपकुमार तिवारी याला ताब्यात घेतले. विचारपूसदरम्याने त्याने गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली. आरोपीला न्यायालयात हजर करून १५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी वर्धा लोहमार्ग पोलिसांनी मिळविली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन वडते यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल तडस करीत आहेत.