जिम नाही "राजकीय आखाडा"! राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला भाजपा कार्यकर्त्यांकडून मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 04:41 PM2022-08-17T16:41:15+5:302022-08-17T16:46:53+5:30
BJP and NCP : कल्याण डोंबिवलीत सुद्धा राजकीय वाद विकोपाला गेलेत. जुन्या राजकीय वादातूनच जिममध्ये घुसून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे.
मयुरी चव्हाण
डोंबिवली - राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला जिममध्ये घुसून भाजपा कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीमध्ये घडली आहे. एकीकडे राज्यात राजकीय वातावरण तापलं असताना आता दुसरीकडे कल्याण डोंबिवलीत सुद्धा राजकीय वाद विकोपाला गेलेत. जुन्या राजकीय वादातूनच जिममध्ये घुसून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्येही कैद झाली असून मानपाडा पोलीस स्टेशनबाहेर राष्ट्रवादी आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
कल्याण डोंबिवलीच्या ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून राजकीय वाद अनेकदा विकोपाला गेलेले दिसून येत आहेत. त्यातच कल्याण ग्रामीण मधला संदप भोपर हा पट्टा कायमच वादग्रस्त चर्चेत असतो. आज सकाळी कल्याण डोंबिवलीचे राष्ट्रवादीचे सरचिटणीस ब्रह्मा माळी हे आपल्या जिममध्ये होते. यावेळी भाजपाचे कार्यकर्ते कुंदन माळी हे अन्य काही कार्यकर्त्यांसोबत जिममध्ये शिरले. जुन्या राजकीय वादातून कुंदन यांनी ब्रह्मा यांना मारहाण केली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
कल्याण ग्रामीणमधील भोपर या गावात अनेक राजकीय वाद याअगोदरही झालेत. प्रकरण पोलीस ठाण्यात गेलीत. आता या वादामुळे पुन्हा राजकरण तापलं आहे. कार्यकर्त्यांची पोलीस स्टेशनच्या आवारातली गर्दी आवरताना मात्र पोलीसांच्या चांगलंच नाकीनऊ आले. ब्रह्मा माळी यांच्या फिर्यादीवरून कुंदन माळी, नितेश सावकार, विनेश माळी आणि मुकेश पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल केला तर कुंदन माळी यांच्या फिर्यादीवरून ब्रह्मा माळी, रमेश पाटील दीलखुश माळी आणि पांडुरंग पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.