भाजपाच्या नगरसेवकाची पोलीस ठाण्यासमोर गोळ्या घालून हत्या, सीबीआय चौकशीची मागणी
By पूनम अपराज | Published: October 5, 2020 02:37 PM2020-10-05T14:37:32+5:302020-10-05T14:43:51+5:30
घटनास्थळी मध्यरात्रीच पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. तर भाजपने या घटनेनंतर राज्यातील बैरकपूरमध्ये बंदचे आवाहन केले आहे.
पश्चिम बंगालमधील भाजपच्या स्थानिक नेत्याला उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील टीटागडजवळ दोन दुचाकीस्वार हल्लेखोरांनी गोळ्या घालून ठार केले. बंगाल पोलिसांनी ही माहिती दिली. दोन हल्लेखोरांनी बीटी रोडवर स्थानिक नगरसेवक मनीष शुक्ला यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर त्याला खासगी रुग्णालयात नेण्यात आले. जेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनास्थळी मध्यरात्रीच पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. तर भाजपने या घटनेनंतर राज्यातील बैरकपूरमध्ये बंदचे आवाहन केले आहे.
भाजपाने या घटनेसाठी तृणमूल काँग्रेसवर (टीएमसी) ठपका ठेवला, परंतु सत्ताधारी पक्षाने ती पूर्णपणे नाकारली. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय म्हणाले, टीएमसीने आता राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी राजकारण सुरू केले आहे, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. पोलीस ठाण्यासमोर ही घटना घडल्यामुळे आम्हाला स्थानिक पोलिसांवर विश्वास नाही. आम्हाला सीबीआय चौकशी पाहिजे आहे.
२५ लाखांच्या लाच प्रकरणी CBI च्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला अटक
मिळालेल्या माहितीनुसार, मनीष शुक्ला रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास टीटागढ पोलीस ठाण्याच्या समोरच असलेल्या पक्ष कार्यालयात बसले होते. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना बैरकपूर येथील बीएन बोस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी अपोलो रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या गोळीबारात आणखी एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. घटनेनंतर परिसरात तणाव आहे. भाजपने बैरकपूरमध्ये १२ तास बंदचे आवाहन केले आहे.