भाजपा नेत्यावर बलात्कार अन् ब्लॅकमेलिंगचा आरोप; सैन्यातील जवानाच्या पत्नीची पोलीस ठाण्यात धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 09:41 AM2021-03-30T09:41:51+5:302021-03-30T09:42:10+5:30
वीर सावरकर वार्डातील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे राजेश श्रीवास्तव यांच्यावर सैन्यातील जवानाच्या पत्नीने बलात्काराचा आरोप लावला आहे
जबलपूर – मध्य प्रदेशात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या नेत्यावर गंभीर आरोप लागले आहेत. एका महिलेने या नेत्यावर आरोप करत पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून भाजयुमोचा नेता फरार आहे. पोलीस सध्या भाजयुमो नेता राजेश श्रीवास्तव याचा जागोजागी शोध घेत आहे. त्याचवेळी या नेत्याचे अनेक बड्या नेत्यांसोबत असलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वीर सावरकर वार्डातील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे राजेश श्रीवास्तव यांच्यावर सैन्यातील जवानाच्या पत्नीने बलात्काराचा आरोप लावला आहे, त्याचसोबत १० लाख रुपये मागितल्याचा दावा केला आहे. सैन्यातील जवानाची पत्नी घरात एकटी राहते, तेव्हा ही संधी साधून आरोपी राजेश श्रीवास्तव तिला भेटण्यासाठी जात असे. एकेदिवशी आरोपीने पीडित महिलेला एक कप चहा मागितला तेव्हा त्या महिलेच्या चहाच्या कपात नशेचा पदार्थ मिसळून तिला बेशुद्ध केले.
आरोपीने पीडित महिलेवर बलात्कार करत त्याचे फोटो आणि व्हिडीओ काढले, त्याचआधारे तो महिलेला ब्लॅकमेल करत होता, आरोपी पीडित महिलेला अश्लिल मेसेज पाठवून तिची बदनामी करण्याची धमकी देत होता. पीडित महिलेने जेव्हा तिचा पती सुट्टीला घरी आला, तेव्हा हा सगळा प्रकार त्याच्यावर कानावर टाकला, यानंतर पीडित महिलेने आरोपीच्या विरोधात १८ मार्च रोजी पोलीस ठाण्यात तक्रार केली.
पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. सध्या आरोपी राजेश श्रीवास्तव फरार आहे, पोलीस त्याचा शोध घेत आहे. मात्र या प्रकरणामुळे भाजपावर टीका करण्याची विरोधकांना आयती संधी सापडली आहे. यावर कोणीही भाजपा नेता बोलण्यास तयार नाही. अनेकजण माध्यमांच्या प्रश्नापासून लांब पळत आहेत.