खळबळजनक! भाजपा नेत्याची हत्या, पत्नीचा काँग्रेसमध्ये असलेल्या दिरांवर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2023 04:36 PM2023-10-15T16:36:52+5:302023-10-15T16:38:44+5:30
भाजपा नेत्याची हत्या करण्यात आली होती. आरोपीने त्यांच्या घरात घुसून हत्या केली. या हत्येनंतर कुरूड पोलीस ठाण्यात भाजपा कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला.
छत्तीसगडच्या धमतरी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कुरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मरौद गावात 15 ऑक्टोबर रोजी सकाळी भाजपा नेत्याची हत्या करण्यात आली होती. आरोपीने त्यांच्या घरात घुसून हत्या केली. या हत्येनंतर कुरूड पोलीस ठाण्यात भाजपा कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. धक्कादायक बाब म्हणजे मृताच्या पत्नीने आपल्याच काँग्रेसमध्ये असलेल्या दोन दिरांवर म्हणजेच मृताच्या भावांवर हत्येचा आरोप केला आहे.
कुरूड पोलिसांवर एफआयआरच्या नावाखाली पैसे घेतल्याचा गंभीर आरोपही महिलेने केला आहे. याप्रकरणी माजी मंत्री आणि कुरुड येथील भाजपाचे उमेदवार अजय चंद्राकर यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून धमतरी एसपीसह टीआय आणि एसडीओपी यांना हटवण्याची मागणी केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या हत्येवरून राजकारण तापलं आहे.
हत्या करण्यात आलेले भाजपा नेते चंद्रशेखर गिरी गोस्वामी हे कुरुडचे माजी आमदार सोम प्रकाश गिरी गोस्वामी यांचे पुत्र होते. मरौड गावात पत्नीसह राहत होते. भावांसोबत मालमत्तेचा वाद सुरू होता. भावांमध्ये यापूर्वीही मारामारी झाली होती. या भांडणाची पोलिसांत तक्रारही करण्यात आली होती. 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 8-10 लोक काठ्या, रॉड घेऊन चंद्रशेखर यांच्या घरी आले.
घराचा दरवाजा तोडून नेत्यावर हल्ला केला. या हल्ल्यात चंद्रशेखर आणि त्यांची पत्नी जखमी झाले. दोघांना धमतरी येथील डीसीएच रुग्णालयात आणण्यात आले. येथे डॉक्टरांनी चंद्रशेखरला मृत घोषित केले. यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी कुरुड पोलीस ठाण्याबाहेर गोंधळ घातला. हल्लेखोर काँग्रेसचे असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.