भाजपाचे नेते गिरीश महाजन यांच्याविरोधात मारहाण, खंडणीचा गुन्हा दाखल
By बाळकृष्ण परब | Published: January 5, 2021 01:05 PM2021-01-05T13:05:35+5:302021-01-05T13:07:21+5:30
Girish Mahajan News :जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या संचालकांना डांबून ठेवल्याप्रकरणी पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात महाजनांविरुद्ध हा मारहाण आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे.
मुंबई/पुणे - भाजपाचे नेते गिरीश महाजन यांच्याविरोधात मारहाण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे गिरीश महाजन यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या संचालकांना डांबून ठेवल्याप्रकरणी पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात महाजनांविरुद्ध हा मारहाण आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे.
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळामध्ये वाद असून, माजी मंत्री असलेल्या गिरीश महाजन यांनी मंडळाच्या संचालकांना डांबून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच या संचालकांकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा आरोपही महाजन यांच्यावर करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणी पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गिरीश महाजन यांच्यासह एकूण २८ जणांवर गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, गिरीश महाजन यांनी आपल्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्याविरोधात राजकीय कारस्थानामधून खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामागे कुणाचा हात आहे, हे सर्वांना माहिती आहे. आता या प्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी गिरीश महाजन यांनी केली आहे.
ही घटना तीन वर्षांपूर्वीची आहे. या तीन वर्षांत अॅड. विजय भास्कर पाटील यांना गुन्हा दाखल करावासा वाटला नाही. आता त्यांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र या प्रकरणाच्या सखोल चौकशीच्या मागणीसाठी मी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच ही घटना कधी आणि कुठे घडली. तसेच मारहाण झाली तेव्हा ही लोकं कुठे होती याची चौकशी करण्याची मागणी केली आहे, असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.