भाजप नेते नरेंद्र मेहतांकडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे छापे; ८.२५ कोटींची बेहिशेबी मालमत्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 05:50 AM2022-05-20T05:50:34+5:302022-05-20T05:53:18+5:30

नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन पथकांकडून मेहतांचे घर व कार्यालयात दिवसभर तपासणी सुरू होती.

bjp leader narendra mehta raid by anti corruption bureau unaccounted assets of rs 8 25 crores | भाजप नेते नरेंद्र मेहतांकडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे छापे; ८.२५ कोटींची बेहिशेबी मालमत्ता

भाजप नेते नरेंद्र मेहतांकडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे छापे; ८.२५ कोटींची बेहिशेबी मालमत्ता

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : नगरसेवक व आमदार म्हणून कार्यरत असताना अधिकाराचा आणि पदाचा दुरुपयोग करून उत्पन्नाच्या ज्ञात स्त्रोतांपेक्षा आठ कोटी २५ लाख ५१ हजार ७७३ रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमवल्याप्रकरणी मीरा-भाईंदरचे भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाने गुरुवारी कारवाई केली. त्यांच्यावर नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन पथकांकडून मेहतांचे घर व कार्यालयात दिवसभर तपासणी सुरू होती.

नरेंद्र मेहता यांनी बेनामी संपत्ती गोळा केल्याची तक्रार लोकायुक्तांकडे करण्यात आली होती. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत खुल्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत ही चौकशी सुरू होती. ही चौकशी पूर्ण झाली असून याप्रकरणी मेहतांवर गुरुवारी नवघर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. जानेवारी २००६ ते ऑगस्ट २०१५ या कालावधीत उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा जवळपास सव्वाआठ कोटी रुपयांची अपसंपदा मेहतांनी जमवल्याचे एसीबीने फिर्यादीत म्हटले आहे.

दोन पथकांकडून घर, कार्यालयाची झडती

ठाणे एसीबीच्या दोन वेगवेगळ्या पथकांकडून नरेंद्र मेहतांचे घर व कार्यालयावर गुरुवारी छापा टाकून तपासणी करण्यात आली. दोन्ही ठिकाणांची झडती गुरुवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या झडतीतून अधिकाऱ्यांच्या हाती काही महत्त्वाचे धागेदोरे लागलेत का, याचा तपशील मिळू शकला नाही.

Web Title: bjp leader narendra mehta raid by anti corruption bureau unaccounted assets of rs 8 25 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.