रक्ताच्या थारोळ्यात पडला होता भाजपा नेता; पोलिसाने लुटली सोन्याची चेन, ४ अंगठ्या, २ मोबाईल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 12:21 PM2024-09-19T12:21:39+5:302024-09-19T12:21:57+5:30
सचिन महोबा रोडवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. नेत्याच्या कुटुंबीयांनी हत्या आणि दरोड्याची भीती व्यक्त केली होती. कारण भाजपा नेत्याचा मोबाईल, अंगठी आणि चेन गायब होती.
उत्तर प्रदेशातील महोबा येथे एका भाजपा नेत्याचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता, त्यानंतर महोबाच्या पोलीस अधीक्षकांनी या घटनेबाबत केलेल्या खुलाशानंतर सर्वच जण हादरले आहेत. महोबा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी भाजपा नेत्याला रुग्णालयात नेत असताना हवालदाराने त्याच्या दोन साथीदारांसह भाजपा नेत्याची सोन्याची चेन, चार अंगठ्या आणि दोन मोबाईल लंपास केले होते. या तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
महोबाच्या चरखारी कोतवाली शहरातील भाजपा युवा मोर्चा मंडळाचे अध्यक्ष सचिन पाठक यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सचिन महोबा रोडवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. नेत्याच्या कुटुंबीयांनी हत्या आणि दरोड्याची भीती व्यक्त केली होती. कारण भाजपा नेत्याचा मोबाईल, अंगठी आणि चेन गायब होती. यानंतर राज्यमंत्री राकेश राठोड यांच्यासह आमदार, माजी खासदार आणि कार्यकर्त्यांनी या प्रकरणाचा लवकरात लवकर खुलासा करण्याची मागणी केली होती.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक पलाश बन्सल यांनी तपासासाठी चार पोलीस पथके तयार केली. तपासादरम्यान पीआरव्ही कॉन्स्टेबल नीलकमलने हे केल्याचं समोर आलं आहे. भाजपा नेत्याकडील असलेल्या मौल्यवान वस्तू लुटल्यानंतर त्याने नेत्याला रुग्णालयात नेलं. पण भाजप नेत्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपा नेते सचिन पाठक हे रेल्वे स्टेशनवरून घरी परतत असताना त्यांचा अपघात झाला होता. त्यात ते गंभीर जखमी झाले.
पोलिसांनी आरोपी कॉन्स्टेबल नीलकमलला अटक केली आहे. पोलीस अधीक्षक पलाश बन्सल म्हणाले, या घटनेत मृताच्या कुटुंबीयांनी हत्येचा संशय व्यक्त केला असून पोलिसांनी गुन्हाही दाखल केला आहे. या प्रकरणाचा खुलासा करताना मदतीसाठी पोहोचलेल्या हवालदाराने त्याच्या दोन सहकाऱ्यांसह नेत्याच्या वस्तू लुटल्याचे उघड झाले. कॉन्स्टेबलचे दोन सहकारी उमेश चंद्र गुप्ता आणि जवाहर पाटकर हे आहेत. या तीन आरोपींची चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला आहे.