धक्कादायक! भाजपा नेत्याच्या मुलाची हत्या; आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 07:17 PM2022-03-24T19:17:00+5:302022-03-24T19:19:04+5:30
Crime News : संतापलेल्या गावकऱ्यांनी बायपासवर गोंधळ घातला. तसेच आरोपींच्या गाडीला आग लावली आहे.
नवी दिल्ली - मध्य प्रदेशमध्ये दोन पक्षांदरम्यान झालेल्या किरकोळ वादातून भाजपा नेते उदय सिंह चौहान यांचा मुलगा सुजीत चौहान यांची हत्या करण्यात आली आहे. संतापलेल्या गावकऱ्यांनी बायपासवर गोंधळ घातला. तसेच आरोपींच्या गाडीला आग लावली आहे. कलेक्टर मनीष सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची देवपुरी कॉलनीत असलेली दोन्ही घरं तोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही दोन्ही घरं अनधिकृत असल्याची माहिती मिळत आहे.
भाजपा नेत्याच्या मुलाच्या हत्येची माहिती मिळताच डीआयजी, एसपी आणि अप्पर कलेक्टर पवन जैन हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. अधिकाऱ्यांनी गोंधळ घालणाऱ्या गावकऱ्यांना समजावलं. त्यानंतर गावकरी शांत झाले आहेत. या घटनेत अनेक जण जखमी झाले. तीन जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिगडंबर गावातील राजा वर्मा नावाच्या व्यक्तीच्या प्लॉटवर बोरिंगचं काम सुरू होतं. याच दरम्यान माती-धूळ उडाल्याने दुसऱ्या पक्षाने बोरिंग बंद करण्यास सांगितलं. यावरून सुरू झालेला वाद पुढे टोकाला गेला. दोन्ही पक्षातील लोकांनी एकमेकांवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला केला. नंतर चाकूने वार करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान भाजपा नेते उदय चौहान यांचा मुलगा सुजीतला देखील चाकू लागला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. पवन जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजीत यांची हत्या केल्याच्या आरोपाखाली लोकेश वर्मा, मलकेश वर्मा, मन्नी, कन्हैया लाल, रोहित बनबारी, भूरा सुंदर, दर्शन प्रकाश आणि राकेश डान यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्रशासनाने देखील कारवाई सुरू केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.