भाजपा नेत्याची बांगलादेशी पत्नी रेश्मा खानवर अटकेची टांगती तलवार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 08:31 AM2022-01-04T08:31:18+5:302022-01-04T08:31:27+5:30
खानचे वकील मिलन देसाई यांनी त्यांची अशील रेश्मा खान हिला अजून दोन आठवडे अंतरिम संरक्षण वाढवण्याची विनंती केली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भाजप नेते हैदर आझम यांची बांगलादेशी पत्नी रेश्मा खान (४८) हिचा अटकपूर्व जामीन अर्ज शिवडी फास्ट ट्रॅक कोर्टाने फेटाळला आहे. तसेच तिला अटकेपासून अंतरिम दिलासा देण्यासही नकार दिल्याने अटकेची टांगती तलवार तिच्या डोक्यावर आहे.
खानचे वकील मिलन देसाई यांनी त्यांची अशील रेश्मा खान हिला अजून दोन आठवडे अंतरिम संरक्षण वाढवण्याची विनंती केली होती. जेणेकरून खानला उच्च न्यायालयाकडे दाद मागता येईल. मात्र यापूर्वी तिला कोर्टात प्रत्यक्ष हजर न राहण्याची अनुमती दिली होती. मात्र वास्तविक पार्श्वभूमी व त्यामध्ये नोंदवलेल्या कारणांसाठी आधीच पारित केलेला आदेश लक्षात घेता, अंतरिम संरक्षण वाढवणे हे न्यायालयाला योग्य वाटत नाही म्हणून, अंतरिम संरक्षण वाढवण्याची विनंती नाकारल्याची माहिती आहे. खानने १४ डिसेंबर, २०२१ रोजी अटकपूर्व जामिनासाठीचा अर्ज शिवडी फास्ट ट्रॅक कोर्टात दाखल केला होता. तेव्हा तिला २३ डिसेंबर, २०२१ पर्यंत अटकेपासून अंतरिम दिलासा मिळाला होता.
डीएनए चाचणी करणार
कथित बांगलादेशी महिला रेश्मा खान हिचा पासपोर्ट बोगस असल्याचे उघड झाल्यानंतर आता तिची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. सुत्रांच्या म्हणण्यानुसार, ती ज्यांना तिचे पालक संबोधत आहे. त्यांच्या सोबत तिचे डीएनए जुळवून पाहिले जाणार आहेत.