'पश्चिम बंगालला बांग्लादेश बनवण्याचा प्रयत्न', CM ममता बॅनर्जींचा भाजपवर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 10:13 PM2024-08-14T22:13:13+5:302024-08-14T22:13:40+5:30
निवासी महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येच्या घटनेने राजकारण तापले आहे.
पश्चिम बंगालमधील महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणाने राजकारण तापले आहे. विरोधक राज्य सरकारवर निशाणा साधत आहे. दरम्यान, आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधकांवर राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. ममता म्हणाल्या की, 'पीडितेच्या कुटुंबाला आधार देण्याऐवजी माकप आणि भाजप या घटनेचे राजकारण करत आहेत. त्यांना वाटते की, ते पश्चिम बंगालचा बांग्लादेश करू शकतात, परंतु मी हे होऊ देणार नाही.'
सरकारवर टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर देताना सीएम ममता बॅनर्जी म्हणाल्या की, 'मला या गुन्ह्याची माहिती मिळताच पोलिस आयुक्तांशी बोलले, पीडितेच्या अंतिम संस्कारापर्यंत मी त्यांच्या संपर्कात होते. मी पीडितेच्या पालकांचेही सांत्वन केले, त्यांना सांगितले की, बलात्कार करणाऱ्याला फाशीची शिक्षा दिली जाईल. पोलिसांनी 12 तासांत आरोपीला अटक केली. हे प्रकरण मंगळवारी सीबीआयकडे सोपवण्यात आले आहे.'
'उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करू'
'कोणत्याही तपासासाठी वेळ लागतो, योग्य तपास केल्याशिवाय कोणावरही कारवाई होऊ शकत नाही. मी डॉक्टरांचा आदर करते, योग्य तपासाशिवाय कोणालाही अटक करू शकत नाही. उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचेही आम्ही पूर्णपणे पालन करू आणि सीबीआयला सहकार्य करू. पोलिसांनी आधीच 34 लोकांची चौकशी केली, यादीत आणखी लोक होते, परंतु उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करून हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले,' असेही त्या म्हणाल्या.
काय आहे प्रकरण?
9 ऑगस्ट रोजी कोलकाता येथील आरजी कार हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये एका महिला निवासी डॉक्टरचा मृतदेह आढळला होता. या महिला डॉक्टरवर 8 ऑगस्टच्या रात्री बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा शवविच्छेदन अहवालही समोर आला असून, तो पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबीयांकडे सोपवला होता. या अहवालानुसार, पीडितेची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉय याला पोलिसांनी अटक केली आहे.