डॉक्टरच्या आत्महत्येनंतर ३६ दिवसांनी BJP खासदारानं मौन सोडलं; सुसाईड नोटमध्ये...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 08:34 IST2023-03-20T08:34:07+5:302023-03-20T08:34:31+5:30
या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी आंध्र प्रदेशचे राज्यसभा खासदार परिमल नाथवानी यांनी गृहराज्य मंत्री हर्ष संघवी यांच्याकडे मागणी केली आहे.

डॉक्टरच्या आत्महत्येनंतर ३६ दिवसांनी BJP खासदारानं मौन सोडलं; सुसाईड नोटमध्ये...
अहमदाबाद - गिर सोमनाथ येथील प्रतिष्ठित डॉ. अतुल चग यांच्या आत्महत्या प्रकरणात भाजपा खासदार राजेश चुडासमा यांनी ३६ दिवसांनी मौन सोडलं आहे. डॉ.चग यांच्या आत्महत्येने मी दु:खी आहे. मी त्यांच्या कुटुंबाच्या वेदना समजू शकतो. या दु:ख सहन करण्याची शक्ती ईश्वराने कुटुंबाला द्यावी असं ते म्हणाले.
खासदार राजेश चुडासमा म्हणाले की, गेल्या ३५ वर्षापासून आमचे डॉक्टरांशी संबंध आहेत. १५-१७ वर्ष डॉ. चग एकटे राहायचे तेव्हा आमच्या घरातून त्यांना टिफिन दिला जायचा. डॉ. चग यांच्या कुटुंबाकडून माझ्यावर जे आरोप लावलेत. जिथे आवश्यकता असेल तिथे माझी पोलीस चौकशीला सहकार्य करण्याची तयारी आहे. नार्को टेस्टही करावी असं विधान त्यांनी केले आहे.
काय आहे प्रकरण?
१२ फेब्रुवारीला डॉ. अतुल चग यांनी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली. या सुसाईड नोटमध्ये नारनभाई आणि राजेशभाई चुडासमा यांच्यामुळे आत्महत्या करत असल्याचं त्यांनी उल्लेख केला. घटनेच्या ५ दिवसांनी १७ फेब्रुवारीला डॉ. चग यांच्या सुसाईड नोटच्या हवाल्याने खासदार राजेशभाई चुडासमा आणि त्यांचे वडील नारनभाई यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. परंतु अद्याप गुन्हा नोंद झाला नाही.
या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी आंध्र प्रदेशचे राज्यसभा खासदार परिमल नाथवानी यांनी गृहराज्य मंत्री हर्ष संघवी यांच्याकडे मागणी केली आहे. कुटुंबानेही सरकारकडे न्याय देण्याची विनंती केली आहे. वेरावल इथं या प्रकरणावरून निदर्शने करण्यात आली परंतु तरीही पोलिसांनी कारवाई केली नाही. त्यानंतर हायकोर्टात याचिका करण्यात आली. पोलिसांच्या या वर्तवणुकीबाबत १३ आणि १५ मार्च रोजी हायकोर्टात सुनावणी झाली आहे. यामध्ये पोलिसांच्या पीआयपासून जिल्हा आणि परिक्षेत्रातील अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले. कोर्टात २८ मार्च रोजी पुढील सुनावणी होणार आहे. पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवून निष्पक्ष तपास करावा, अशी कुटुंबीयांची मागणी आहे.
वेरावलमध्ये आक्रोश
सुसाईड नोटच्या आधारे डॉ.चग यांचे कुटुंबीय हायकोर्टात गेले आहे तर दुसरीकडे वेरावल परिसरात डॉ. चग यांचे समर्थक व त्यांचे नातेवाईक न्यायाच्या मागणीसाठी आवाज उठवत आहेत. डॉ.चग यांनी आपल्या वैद्यकीय सेवेतून वेरावल परिसरात चांगली प्रतिमा निर्माण केली होती. डॉ चग यांनी कोरोनाच्या कठीण काळात लोकांना खूप मदत केली होती. चग यांच्या आत्महत्येनंतर रघुवंशी (लोहार) समाजातही आत्महत्येची चौकशी न झाल्याने संताप व्यक्त होत आहे.
कोण आहेत राजेश चुडासामा?
१० एप्रिल १९८२ रोजी जन्मलेले राजेश चुडासामा हे कोळी समाजाचे आहेत. आक्रमक नेता ही त्यांची ओळख आहे. चुडासामा हे २०१२ मध्ये जुनागडच्या मंगरूळ मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते, आमदार असताना, चुडासामा यांना पक्षाने २०१४ मध्ये लोकसभेचे तिकीट दिले होते आणि ते खासदार म्हणून निवडून आले होते. यानंतर २०१९ मध्येही ते खासदार झाले. राजेश चुडासामा (४०) हे जुनागड जिल्ह्यातील चोरवाड येथे राहतात. राजेश चुडासामा २०१४ मध्ये खासदार झाले तेव्हा ते गुजरातमधील सर्व खासदारांमध्ये सर्वात तरुण होते.