भाजपा पदाधिकारी धनंजय कुलकर्णीला न्यायालयीन कोठडी; जामिनाचा मार्ग मोकळा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 09:14 PM2019-01-22T21:14:53+5:302019-01-22T21:16:44+5:30
कुलकर्णीच्या जामीनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे पोलिसांकडून कोणताही युक्तिवाद केला गेला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
कल्याण - बेकायदा शस्त्रसाठ्याप्रकरणी अटकेत असलेला डोंबिवलीतील भाजपचा पदाधिकारी धनंजय कुलकर्णी याला आज पुन्हा 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर कुलकर्णीची रवानगी आधारवाडी कारागृहात करण्यात आली आहे. त्यामुळे कुलकर्णीच्या जामीनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे पोलिसांकडून कोणताही युक्तिवाद केला गेला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
मानपाडा रोड परिसरात ‘तपस्या हाउस ऑफ फॅशन’ या दुकानात शस्त्रांचा हा साठा सापडला. कल्याण गुन्हे शाखेने मंगळवारी कुलकर्णीला अटक केली. पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी न केल्याने मंगळवारी त्यास न्यायालयीन कोठडी देण्यात आली. मात्र, माध्यमांमध्ये याबाबत चर्चा सुरू झाल्याने कुलकर्णीला पोलीस कोठडी मिळावी, यासाठी पोलिसांची धावाधाव सुरू होती. कुलकर्णीने एवढी शस्त्रे कशाकरिता बाळगली होती? घातपात घडवण्याचा त्याचा प्रयत्न होता का? या दृष्टीने पोलीस तपास करीत आहेत.