जामनेर तापले! पत्नीसमोर रुबाब दाखवायला गेला; भाजपा कार्यकर्त्याला पोलीस निरीक्षकाने बदडले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2021 10:07 PM2021-02-08T22:07:07+5:302021-02-08T22:08:07+5:30
Crime news : सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास जामनेर तालुक्यातील पाळधी येथील भाजपचे पदाधिकारी असलेले संतोष चौधरी हे शिरसाळा मारूतीचे दर्शन घेण्यासाठी कुटुंबासह आले होते, जाताना त्यांनी बोदवड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ कार रस्त्यात उभी करून, भाजीपाला घेण्यासाठी उतरले .
बोदवड : रस्त्यात वाहन लावल्याचा प्रकार येथे चांगलाच तापला आहे. यामुळे जामनेर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्याला पोलीस निरीक्षकाने त्याच्या पत्नीसमोर मारहाण तर केली परंतु गाडीच्या काचाही फोडल्याची कैफीयत असून हा प्रकार पोलीस अधीक्षकांपर्यंत पोहचला आहे. ( Car Parked on Road, BJP worker beaten by police inspector in jamner)
या खळबळजनक घटनेबाबत उपस्थित कार्यकत्यांकडून मिळालेली माहिती अशी की, सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास जामनेर तालुक्यातील पाळधी येथील भाजपचे पदाधिकारी असलेले संतोष चौधरी हे शिरसाळा मारूतीचे दर्शन घेण्यासाठी कुटुंबासह आले होते, जाताना त्यांनी बोदवड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ कार रस्त्यात उभी करून, भाजीपाला घेण्यासाठी उतरले असता मागून पोलीस निरीक्षक राहूल गायकवाड यांचे वाहन जात असताना वाहतुकीस अडथडा ठरण्याऱ्या या वाहनाला त्यांनी अटकाव करत गाडी चालकाला आवाज दिला. त्यांना बराच वेळ प्रतिसाद न मिळाल्याने पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड हे खाली गाडीतून उतरले व त्यांनी सदर गाडीचे साईड ग्लास काठीने फोडले, त्याचा राग गाडी मालक संतोष चौधरींना आला व त्यांनी पोलीस निरीक्षक यांच्याशी अरेरावी केली त्यातून त्यांचा संताप अनावर झाला व त्यांनी त्यांच्या कुटुंबीय व पत्नी समोर चौधरी यांना बदडले व पोलीस वाहनात बसवून पोलीस ठाण्यात घेऊन गेले. तेथे ही त्यांना बदडले असता मागून सदर कुटुंबीय धावत पोलीस ठाण्यात आले, व तेथे ही पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड व गाडी चालकाच्या पत्नीचा वाद झाला. पोलीस निरीक्षक यांनी गुन्हा दाखल करण्याचे सांगितले, असता संतोष चौधरींच्या पत्नीनेही तुम्ही एका महिलेला असभ्य वागणूक देत असल्याचा आरोप केला व गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. हा असा वाद सुमारे तासभर सुरू होता.
शेवटी सर्व प्रकारण जामनेरचे आमदार गिरीश महाजन तसेच माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पर्यंत गेले व सर्व राष्ट्रवादी व भाजप कार्यकर्ते पोलीस ठाण्यात आले. सदर प्रकरण मिटिवण्यास सांगत सदर गाडी चालकाने अरेरावी केली त्याची माफी मागावी व हे प्रकरण मिटवावे असे ठरले पण बराच वेळ दोन्ही मंडळी अडून बसल्याने शेवटी बोदवड पोलिसांनी कलम १८६ प्रमाणे संतोष चौधरीवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंद केला, तर संतोष चौधरी हे मारहाण केल्याचा व्हिडीओ जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे घेऊन गेले आहे, असे कार्यकर्त्यांनी सांगितले.
सदर व्यक्ती विरुद्ध रितसर गुन्हा नोंद करण्यात आला असून त्याने अरेरावी करत नोकरी खाऊन घेतो असा दम ही दिला होता. तर हटकल्यानंतर मारहाण केली, असा संबंधिताने केलेला आरोप चुकीचा आहे.
- राहुल गायकवाड, पोलीस निरीक्षक