Black Magic: शिवसेना उमेदवारांच्या पराभवासाठी अघोरी प्रकार; शहापूर नगरपंचायत निवडणुकीतील उताऱ्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 11:12 AM2022-01-14T11:12:43+5:302022-01-14T11:13:42+5:30
Black Magic in Shahapur Election: शिवसेना विरुद्ध भाजपा अशी प्रमुख लढत असलेल्या शहापूर नगरपंचायत निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोर लावला आहे.
- शाम धुमाळ
कसारा : शहापूर नगरपंचायत निवडणूक नुकतीच पार पडली तर अवघ्या ४ जागांसाठी येत्या आठवड्यात निवडणूक होणार आहे. मात्र, या निवडणुकीचा निकाल एकत्रित लागणार असून उर्वरित निवडणूक होण्या अगोदर व निकाल जाहीर होण्याअगोदर अज्ञात व्यक्तींकडून अघोरीं कृत्य केले जात असल्याचे शहापूरच्या पठाणवाडा येथील पिपंळाच्या झाडाखाली आढळून आहे.
शिवसेना विरुद्ध भाजपा अशी प्रमुख लढत असलेल्या शहापूर नगरपंचायत निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोर लावला आहे. परंतु ज्या उमेदवारांना आपल्या विजयाची खात्री नाही अशा अज्ञात उमेदवारांनी म्हणा किंवा त्यांच्या अज्ञात हितचिंतकांनी शिवसेनेचा उमेदवार पडावा म्हणून जादूटोणा सारखा अघोरी प्रकार केला आहे.
शिवसेनेच्या उमेदवार रजनी संतोष शिंदे, मालती म्हात्रे , विजय भगत, जान्हवी देशमुख (काँग्रेस), या सह अन्य दोन उमेदवारांच्या नावाने चिठ्या बनवून त्यावर उमेदवाराचे फोटो व निशाणी व त्या पुढे यांची हार होऊ दे असे लिहिलेले आहे. त्यावर बराच उतारा करून त्या चिठ्या एका पिंपळाच्या झाडाखाली आज स्थानिकांना आढळून आल्या. झाडाखाली काहीतरी पेटवून त्याच्या बाजुला ह्या चिठ्या
ठेवल्याचे आढळून आले.
शिवसैनिकांच्या ही बाब लक्षात येताच सर्वांनी धाव घेत त्या चिठ्यांचा प्रकार व अघोरीं प्रकाराचा डाव हणून पाडला. शिवसैनिकांनी या घटनेचा निषेध करीत आताच विरोधकांच्या पाया खालची वाळू सरकली असून मायबाप जनतेने शिवसेनेला कौल दिला असल्याने विरोधक बेचैन झाल्याची प्रतिक्रिया दिली.